बिरसी फाटा : जिल्ह्यात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यातच खरीप हंगामातील धानाची उचल अद्यापही झाली नसल्याने लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. तर बऱ्याच प्रमाणात धान गोदामात पडून असल्याने हंगामातील धान खरेदीची अडचण निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर फारच मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर त्वरित तोडगा काढून रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरू करण्याची मागणी पांडव सहकारी भात गिरणीचे अध्यक्ष तुषार घरटे यांनी केली.
यावर्षीच्या खरीप हंगामात शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली, मात्र विक्री केल्यापासून धान मिलिंगसाठी पाठविण्यात आला नाही. त्यामुळे अद्यापही घाण केंद्रावरच पडून आहे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील धानाची मळणी सुरू असून रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र शासन स्तरावरील पाहिजे त्या प्रमाणात धानाची हंगामातील प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून धानाची उचल व रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र करण्यासंदर्भात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व अन्नपुरवठा विभागाचे सचिव यांच्याशी प्रत्यक्ष भेटून धान खरेदीचा प्रश्न मार्गी लावण्यात पाठपुरावा केला तरी शेतकऱ्यांकडील रब्बी हंगामातील आलेले धान खरेदी करण्यासाठी त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यास मदत होईल. खरीप हंगामाची कामे शेतकऱ्यांपुढे येणार असल्याने त्यांनी रब्बी हंगामातील धान कुठे साठवून ठेवावे व रब्बी हंगामाकडे लक्ष द्यावे की धान विक्रीसाठी केंद्राकडे धाव घ्यावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे त्वरित शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे.