गोंदिया : जुलै महिन्यात कोरोनाचा संसर्ग ९० टक्के आटोक्यात आला. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. तर ऑगस्ट महिन्याची सुरुवात देखील दिलासादायक झाली. रविवारी (दि.१) रोजी जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताची नोंद झाली नाही तर दोन बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे ऑगस्ट महिन्याची सुरुवात दिलासादायक झाल्याचे चित्र आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी (दि.१) ३९० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३५२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ३७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही कोरोना बाधित आढळला नाही त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोनाचा संसर्ग जवळपास आटोक्यात आला असून तीन तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर उर्वरित पाच तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ ते ३ आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४३५५२५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २१७८८७ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१७६३८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४११९२ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत ४११९२ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०४७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ११ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोरोनाचा रिकव्हरी दर ९८.२६ टक्के आहे.
.............
६ लाख नागरिकांचे लसीकरण
कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण १९० लसीकरण केंद्रांवरुन लसीकरण केले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ५ लाख ९७ हजार ९९९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची टक्केवारी ४९.५ टक्के आहे.
..............
संसर्ग आटोक्यात पण निष्काळजीपणा नको
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी कोरोनाला पूर्णपणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. आपला थोडाही निष्काळजीपणा कोरोनाला निमंत्रण देणारा ठरु शकतो. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेण्याची गरज आहे.