मसरामटोलावासीयांची मागणी : धान मळणीला सुरुवातशेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव (सडक) अंतर्गत येणाऱ्या मसरामटोला येथील एकाधिकार धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात धानाची रोवणी केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान कापणीला आले आहे. कापणी सोबतच मशीनीद्वारे मळणीला सुद्धा सुरुवात झाली आहे. धान खरेदी केंद्र त्वरित सुरू केल्यास शेतकऱ्यांना धान विकणे सोईचे होईल व व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबेल.या परिसरातील शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या तुलनेत अधिक रबी धानाचे पिक घेतले. पुतळी, प्रधानटोला, नरेटीटोला, कोहळीटोला, कोयलारी, मसरामटोला, शेंडा, आपकारीटोला व मोहघाट मिळून जवळपास २५० हेक्टरमध्ये धानाची लागवड करण्यात आली आहे. यामधून २० हजार क्विंटल धानाचे उत्पादन होईल. पावसाळी हंगामात वरिल सर्व गावातील शेतकऱ्यांचे धान मसरामटोला येथील धान खरेदी केंद्रातच खरेदी केले जाते.मागील वर्षी गोदामाचा मुद्दा समोर करुन मसरामटोला धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्याची पुनरावृत्ती व्हायला नको असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी मसरामटोला गोदामातील धानाची उचल झाली असून एकही साठा शिल्लक नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मसरामटोला धान खरेदी केंद्र सोईचे ठरत असल्यामुळे संबंधित व्यवस्थापकीय महामंडळाची अधिकाऱ्याने मसरामटोला येथील धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
धान खरेदी केंद्र सुरू करा
By admin | Published: April 17, 2016 1:43 AM