बाराभाटी : खरिपाचा हंगाम संपला की, काही दिवसातच रब्बी धानाची लागवड केली जाते. काही दिवसातच रब्बी धान निघण्याच्या तयारीत आहे. मात्र, खरिपातील धानाची उचल झाली नसल्याने रब्बीतील धान खरेदी सुरू झाली नाही. परिणामी धान खरेदी करणाऱ्या संस्था आणि शेतकरी या दोघांचीही कोंडी झाली आहे. खरिपातील धानाची त्वरित उचल करून रब्बीतील धान खरेदी त्वरित सुरु करण्याची मागणी काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती तालुका उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य प्रीतम रामटेके यांनी केली आहे.
ग्रामीण भागासह गोंदिया जिल्हा शेतीवर अवलंबून आहे. आपला तांदूळ उत्पादक जिल्हा अशी जिल्ह्याची राज्यात ओळख आहे. त्यापैकी तालुका अर्जुनी मोरगाव हे धान्याचे कोठार समजले जाते. या तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, ईळदा आहे. आदिवासी सहकारी संस्थांमध्ये उन्हाळी म्हणजे रब्बी धानपीक विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. या भागात धानाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. धानाचे उत्पादनसुध्दा चांगले आहे. मात्र, रब्बीतील धान खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे रोजगार हिरावला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने त्वरित धानाची उचल करुन धान खरेदी करण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.
........