बाळू बडवाईक यांची मागणी : सामान्य जनतेच्या कामाला गती द्याबोंडगावदेवी : गेल्या कित्येक वर्षांपासून मंजूर झालेला उपविभागीय कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे विनाविलंब सुरू करण्याची मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते बाळू बडवाईक यांनी केली आहे.अर्जुनी-मोरगाव तसेच सडक-अर्जुनी हे दोन तालुके मिळून उपविभागीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली होती. नव्याने निर्माण होणाऱ्या उपविभागीय कार्यालयाचे मुख्यालय अर्जुनी-मोरगाव राहणार, असे शासनाच्या वतीने ठरविण्यात आले होते. काही वर्षापूर्वी अर्जुनी-मोरगाव येथे उपविभागीय कार्यालय सुरु होण्याच्या तयारीत असताना सडकअर्जुनीच्या जागरूक नागरिकांनी न्यायालयाचे दार ठोठावून उपविभागीय कार्यालय सडक-अर्जुनीला द्या, अशी दाद मागितली होती. दोन्ही तालुक्यांचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर उपविभागीय कार्यालयासाठी अर्जुनी-मोरगाव तालुकाच योग्य असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आले. अखेर उपविभागीय कार्यालयाचे मुख्यालय अर्जुनी मोरगाव येथे मंजूर झाल्याने विनाविलंब कार्यालयाचा कारभार सुरू करण्याची मागणी तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते बाळू बडवाईक यांनीे केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाचे उपसचिव कि.पा. वडते यांच्या महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ५ जानेवारी २०१६ अन्वये गोंदिया जिल्ह्यातील १४१ अनुक्रमांकाच्या मोरगाव अर्जुनी या उपविभागात मोरगाव अर्जुनी व सडक अर्जुनी या दोन तालुक्यांचा समावेश आहे. उपविभागाचे मुख्यालय मोरगाव अर्जुनी राहणार असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रालय स्तरावर मंजूर असलेल्या उपविभागीय कार्यालय मोरगाव अर्जुनी येथे त्वरित सुरू करुन सामान्य जनतेच्या कामाला गती देण्याची मागणी बाळू बडवाईक यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
उपविभागीय कार्यालय सुरू करा
By admin | Published: January 21, 2016 1:40 AM