सोनपुरी : आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृह सुरू करा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्यावतीने पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित वंजारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात, २० नोव्हेंबर २०२० च्या शासन निर्णय (आदिवासी विकास विभाग) नुसार आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृह, १ डिसेंबर २०२० पासून वर्ग ९ ते १२ वीपर्यंत चालू करण्याचे आदेश असताना ही विभागाच्या उदासीन धोरणामुळे शाळा सुरू करण्यात आल्या नाही. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, वसतिगृहात वर्ग ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून पत्राद्वारे आदिवासी वसतिगृह सुरू करण्यात यावे, जिल्ह्यातील विज्ञान-गणित विषयात बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आदिवासी विभागामार्फत मोफत नीट व जेईईसाठी पूर्व प्रशिक्षण वर्गाची व्यवस्था करण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाने गोंडगोवारी संबंधाने दिलेल्या निर्णयानुसार आदिवासी विभागाच्या विविध योजनांतून गोवारी समाजातील लाभार्थ्यांना वगळण्यात यावे, आदिवासी विभागांतर्गत मंजूर झालेल्या खावटी योजनेचा निधी आतापर्यंत आदिवासीपर्यंत मिळाला नाही. त्याकडे विशेष लक्ष देऊन शासनाकडून पाठपुरावा करावा यासह मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात फेडरेशनचे माजी जिल्हाध्यक्ष राधेश्याम टेकाम, उपाध्यक्ष बाळा उईके, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, दादाजी पंधरे, यू.जी. फरदे, एन.जी. घासले, सूरजलाल मडावी, संतोष कुसराम, प्रेमलाल कोरंडे, विलास कळपाते, हिवराज मानकर, एस.आर. लटये, सुकचंद मडावी, अरविंद सोयाम, राजेश भोयर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.