गोंदिया : उद्योजकता विकास केंद्र व धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने उद्द्योजकता विकास या विषयावर कार्यशाळेचे आयोजन २८ व २९ २०२१ रोजी वेबिनार द्वारे करण्यात आले असून या कार्यशाळेची सुरूवात शुक्रवारी झाली.
उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अंजन नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून महेंद्र ठाकूर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नीरज जागरे, व्यवस्थापक, जिल्हा उद्योजकता केंद्राचे व्यवस्थापक हेमंत बदार, आयक्यूएसी समन्वयक डाॅ . दिलीप चौधरी व कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. नायडू यांनी, विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता प्रशिक्षण का आवश्यक आहे यावर विस्तृत मार्गदर्शन केले. डाॅ. चौधरी यांनी, महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. तसेच विद्यार्थ्यांनी उद्यमी होण्याचे स्वप्न बघावे व उद्यमी व्हावे हा संदेश दिला.
ठाकूर यांनी, उद्द्योजकतेच्या पाऊलवाटा या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच उद्यमी बनण्यासाठी त्यांचा खडतर व प्रेरणादायी जीवनप्रवास उपस्थितांसमोर ठेवला. जागरे यांनी, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या ( नाबार्ड ) विविध उपक्रम व योजनांची माहिती करून दिली.
प्रास्ताविक मांडून आभार प्रा.चव्हाण यांनी मानले. संचालन तसणीम शेख या विद्यार्थिनीने केले. याप्रसंगी २५० विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी प्रा. संजय तिमांडे, डाॅ. जयंत महाखोडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.