अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसमध्ये कुरघोड्या सुरू आहेत. कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबरोबर संघटनात्मक पदावर नियुक्त्या सुरू झाल्या. या नियुक्त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दखल घेऊन नवनियुक्त कार्याध्यक्षांना दणका दिला आहे.
गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसमध्ये कुरघोड्यांचे सत्र सुरू आहे. यामुळे पक्षात गटबाजीला उधाण आले आहे. यापूर्वी गटबाजी नव्हती असे नाही पण विपक्षाचे विरोधाचे वेळी हे गट एकत्र येऊन विरोध करायचे. मात्र अलीकडे हे दोन्ही गट एकमेकांच्या कार्यक्रमात दिसून येत नाहीत. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने रत्नदीप दहिवले यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती केली. त्यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीचे वेळी पक्षात बंडखोरी करून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरुध्द दंड थोपटले होते. शेवटी काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला होता. अशा कार्यकर्त्याला मोठ्या संघटनात्मक पदावर नियुक्ती दिली याची दुसऱ्या गटात कुरबूर सुरू होती. अशातच त्यांनी जिल्हाध्यक्षांची परवानगी न घेता अर्जुनी मोरगाव येथे संघटनात्मक पदावर नियुक्त्या केल्या. यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.नामदेव किरसान यांना अर्जुनी मोरगाव येथे येऊन पत्रकार परिषद घ्यावी लागली होती हे सर्वश्रुत आहे. पत्रपरिषदेत त्यांनी कार्याध्यक्षांना नियुक्तीचे अधिकार नसल्याचा खुलासा केला होता. या नियुक्त्यांच्या तक्रारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे करण्यात आल्या. याची कमिटीने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी यांच्या स्वाक्षरीचे पत्र क्र ४२५ शुक्रवारी येऊन धडकले. यात कोणत्याही नियुक्त्यांचे प्रस्ताव जिल्हाध्यक्षांमार्फत प्रदेश कार्यालयास सादर होणे अपेक्षित असते. अशा नियुक्त्यांसंदर्भात रीतसर प्रस्ताव जिल्हाध्यक्षांमार्फत प्रांताध्यक्षांच्या मान्यतेसाठी पाठवावा असे नमूद आहे. कमिटीने अशा प्रकारची सूचना करून कार्याध्यक्षांची चांगलीच गोची केली. जिल्ह्यात हे षडयंत्र रचण्यात एका आमदाराचा हात असल्याच्या चर्चा आहेत. खरच जर त्यांचा हात असेल तर त्यांनाही ही चांगली चपराक समजली जाते आहे.