गोंदिया : जिल्हा परिषद व शासनाच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामपंचायतींचे पथदिव्यांचे बिल थकले असून, यामुळे कित्येक ग्रामपंचायतींची जोडणी महावितरणने कापली आहे. या ग्रामपंचायतींना १५ व्या आयोगातून एवढा निधी भरणे शक्य नसल्याने राज्य शासनाने ग्रामपंचायतींना पथदिव्यांचे बिल भरण्यास मदत करावी, अशी मागणी आम्ही राज्य शासनाकडे पत्रव्यवहारातून केली असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.
लगतच्या ग्राम नागरा-चांदनीटोला येथे रस्ता लोकार्पण कार्यक्रमात नागरिकांना माहिती देताना ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी, जिल्हा परिषद व शासनाच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती निर्माण झाली असून, आता पावसाळ्यात कित्येक गावे अंधारात आहेत. अशात सरपटणाऱ्या विषारी कीटक व प्राण्यांपासून गावकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ग्रामविकास विभागाने यावर ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयोगातून बिल भरण्यास मंजुरी दिली आहे. मात्र ग्रामपंचायतींना एवढे बिल भरणे शक्य नाही. करिता राज्य शासनाने मदत करावी याबाबत पत्र व्यवहार केला आहे. तसेच मंत्रालय याबाबत बोलणी करून हा विषय मांडला असल्याचेही त्यांनी सांगितले.