भंडाराची टीम गोंदियात : शौचालयांची पाहणी व नागरिकांशी संवाद लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नागरी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांंतर्गत हागणदारीमुक्त शहरातील शौचालय बांधकामाची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरीय समितीने गोंदियात दोन दिवस मुक्काम ठोकून शहरातील विविध भागांची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. भंडारा येथील ही टीम शुक्रवार व शनिवारी गोंदियात होती व यात त्यांनी शौचालय बांधकामाचा चांगलाच आढावा घेतला. देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरिता शहरांना स्वच्छता आणि शहरांमधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. शहरांत राबविण्यात येणाऱ्या या नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबास वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन शौचालय तयार करवून घेतले जात आहेत. यासाठी नगर पालिका क्षेत्रातील वैयक्तीक शौचालय नसलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. गोंदिया शहर जिल्ह्याचे ठिकाण असले तरी आजही येथील कित्येकांकडे वैयक्तीक शौचालय नाहीत. ग्रामीण भागातच उघड्यावरील शौचाचा प्रकार असतो हे खरे नाही. कारण शहरातही उघड्यावर कमी मात्र सार्वजनिक शौचालयांचा आधार वैयक्तीक शौचालय नसलेल्या परिवारांना घ्यावा लागत असल्याचे सत्य आहे. या प्रकारावर पूर्णपणे विराम लागावा व प्रत्येकाकडे वैयक्तीक शौचालय असावे. जेणेकरून शहरी नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्या व सोबतच शहरातील वातावरणही स्वच्छ असावे, हाच उद्देश धरून केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. तर या अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात असून त्यातूनच नागरी शौचालय बांधकामाची मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत शहरात शौचालय बांधकाम करण्यात आले असून शहर हागणदारीमुक्त झाले व याचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय समिती शुक्रवारी (दि.२३) गोंदियात आली होती. समितीत भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनील अरागडे, प्रशासन अधिकारी माधुरी मडावी, पत्रकार चेतन भैरम, एनजीओचे अशोक बेलेकर होते. शुक्रवारी (दि.२३) आलेल्या या समितीने सायंकाळी तसेच शनिवारी (दि.२४) सकाळपासूनच आपले काम सुरू केले. या समितीने येथील मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्यासह स्वच्छता निरीक्षक गणेश हतकय्या, मुकेश शेंदे्र व मनिष बैरीसाल यांच्यासह शहरातील सुर्याटोला, बांधतलाव, हरिकाशी नगर, गौतमनगर, पिंडकेपार व अन्य भागांची पाहणी केली. यात समितीने खाजगी शौचालयांसह सार्वजनिक शौचालय व उघड्यावर शौच केले जाते त्या ठिकाणांची पाहणी केली. एवढेच नव्हे तर नागरिकांशी संवाद साधत शौचालयांचे अनुदान, बांधकाम आदि विषयांवर चर्चा केली.
राज्यस्तरीय समितीने केली पाहणी
By admin | Published: June 26, 2017 12:17 AM