लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एचआरसीटी सीटी स्कॅन करिता पूर्वी खासगी रूग्णालयात ६५०० रुपयांपेक्षा अधिक आकारले जात होते. कोविडमुळे एचआरसीटी सीटी स्कॅन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे एचआरसीटी सीटी स्कॅनकरिता रुग्णांना अतिरिक्त भुर्दंड बसू नये यासाठी राज्यभरासाठी आता २५०० रुपये दर निश्चित केले आहे. यापेक्षा अधिक दर आकारता येणार नाही नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज (दि.२४) गोंदिया येथे सांगितले.एचआरसीटी सीटी स्कॅन करिता राज्यभरात आता एकच दर असणार असून याची अंमलबजावनी शुक्रवारपासून सर्वत्र करण्यात येणार आहे. यासंबंधिचे परिपत्रक गुरूवारीच आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता एचआरसीटी सीटी स्कॅनकरिता २५०० रुपयांपेक्षा अधिक दर खासगी रुग्णालयांना आकारता येणार आहे. काही ट्रस्ट रुग्णालयात याचे दर यापेक्षा कमी असेल तर त्यांना सुध्दा यात वाढ करता येणार नाही. यापेक्षा अधिक दर घेणाऱ्या रुग्णालयांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
या निर्णयामुळे सीटी स्कॅन करणाऱ्या रुग्णांना निश्चितच दिलासा मिळाणार आहे. तसेच याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सुध्दा सर्व खासगी रुग्णालयाला देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले. तसेच प्लाज्मा थेरपीकरिता अतिरिक्त दर आकारले जात आहे. त्यामुळे याला सुध्दा आता प्रतिबंध लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख, खा. प्रफुल्ल पटेल, माजी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते.
ऑक्सिजनचा काळाबाजार रोखणारगोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नागपूर येथील रुक्मीनी ऑक्सिजन प्लान्टमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र येथून अनियमित पुरवठा केला जात असल्याने अडचण होते. त्यामुळे नागपूर रुक्मीनी ऑक्सिजन प्लान्टच्या संचालकाला शुक्रवारी बोलावून आवश्यक सूचना करण्यात येणार आहे. तसेच ऑक्सिजनचा काळाबाजार होणार नाही याची सुध्दा काळजी घेण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.