लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तंबाखू सेवनामुळे शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होतात. तंबाखूमध्ये निकोटीन हा हानीकारक पदार्थ असतो. त्यामुळे प्रत्येकाने तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावे व निरोगी आयुष्य जगावे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत चिकित्साशास्त्र विभागाच्या डॉ. कविता मदान यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर होते. अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव एम.बी. दुधे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी. कटरे, केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या दंत शल्यचिकित्सक ममता सरोदे, डॉ.शैलेश कुकडे, डॉ.दिपाली कोल्हटकर व सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर उपस्थित होत्या.डॉ.मदान पुढे म्हणाल्या, भारत तंबाखू उत्पादनामध्ये व तंबाखू सेवन करण्यामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तंबाखू पदार्थात जवळपास २८ कर्कजन्य रसायने असतात, जी शरिराला अत्यंत हानीकारक असतात. तंबाखूमध्ये असलेला निकोटीन हा घटक पदार्थ अत्यंत विषारी समजला जातो, जो मानवी शिरराला उत्तेजीत करतो. अमेरिकेत झालेल्या एका सामाजिक संस्थेच्या अहवालानुसार तंबाखूच्या वापरामुळे शरिरातील जवळपास सर्व अवयवांवर घातक परिणाम होवून विविध आजार होतात. त्यामुळे संपूर्ण आरोग्य धोक्यात येते. आज जगामध्ये १० मधील एका प्रौढ माणसाचा मृत्यू हा तंबाखू सेवन केल्याने होतो. तसेच जगामध्ये दरवर्षी जवळपास ६० लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनाने होतो, असे त्यांनी सांगितले.सरोदे म्हणाल्या, तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने विविध प्रकारचे आजार आपल्याला होवू शकतात. तंबाखू सेवन हे जगामधील मृत्यूचे एक प्रमुख कारण ठरले आहे. सन २००४ च्या भारतातील तंबाखू नियंत्रणाच्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी ८ ते ९ लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतो. तंबाखू नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी तंबाखू नियंत्रण कायदा २००३ तयार करण्यात आला. हा कायदा भारतात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे नियंत्रण करतो, असे त्या म्हणाल्या.डॉ.कुकडे म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच तंबाखू प्रतिबंधाबाबत विविध कायद्याची माहिती सांगितली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास व्यक्तीस २०० रूपये दंड आकारण्याची तरतूद कायद्यात आहे. तसेच १८ वर्षाखालील व्यक्तीस तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनीय अपराध समजला जातो, असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक अॅड.एम.पी. चतुर्वेदी यांनी मांडले. आभार अॅड. अर्चना नंदघळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी जी.सी. ठवकर, पी.एन. गजभिये, एल.पी. पारधी, ए.जे. नंदेश्वर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:03 AM
तंबाखू सेवनामुळे शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होतात. तंबाखूमध्ये निकोटीन हा हानीकारक पदार्थ असतो. त्यामुळे प्रत्येकाने तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावे व निरोगी आयुष्य जगावे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत चिकित्साशास्त्र विभागाच्या डॉ. कविता मदान यांनी केले.
ठळक मुद्देकविता मदान : विविध आजारांमुळे आरोग्य धोक्यात