संदीप जाधव : एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : वैभवसंपन्न गोंदिया जिल्ह्यातील शैक्षणिक स्तर चांगला आहे. फक्त विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याची जिद्द बाळगावी. त्या दृष्टीने अभ्यास करावा. विशेषत: शालेय शिक्षणापासूनच सखोल अभ्यास करुन दैनिक वृत्तपत्र तसेच अभ्यासक्रमासाठी योग्य पुस्तके एकाग्रतेने वाचन केल्यास यश आपण मिळवू शकतो, असे विचार गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.अर्जुनी मोरगाव येथे मागील दोन वर्षापासून कुणबी समाज संघटनेद्वारे जय भवानी स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन केंद्र बहुउद्देशीय हायस्कूल येथे सुरू केले आहे. येथे एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात जाधव मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी गोंदियाचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव होते. अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रिकापुरे, सेवानिवृत्त प्राचार्य मंजू चंद्रिकापुरे, सहकार अधिकारी प्रशांत गाडे, सुनीता हुमे, उद्धव मेंहदळे, डॉ. गजानन डोंगरवार उपस्थित होते.जाधव पुढे म्हणाले, आपण स्वत: आपणाला ओळखून पालकांना विश्वासात घ्या. स्पर्धा परीक्षेचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करुन दैनंदिन वाचन तयार करावे. त्यानुसार मित्र, नातेवाईकांचे कार्यक्रम जवळपास दोन तीन वर्षे बाजूला ठेवून अभ्यास करावे. मराठी व इंग्रजी दैनिक दररोज हाताळावे. पहिल्या वर्गापासून बारावीपर्यंतच्या अभ्यासाकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे. निश्चितच आपण यशस्वी होवू शकता, असे सांगून स्वत:चा जीवनपट विशद करताना जाधव म्हणाले, मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. प्राथमिक शिक्षण गावातील जुन्या जीर्ण शाळेत झाले. परंतु लहानपणापासून मनामध्ये जिद्द, चिकाटी, ध्येय असल्याने आपण येथपर्यंतचा टप्पा गाठला असून आपणसुद्धा यशस्वी व्हा, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.मनोहरराव चंद्रिकापुरे मार्गदर्शन करताना म्हणाले, आपल्या जिल्ह्यात खूप प्रशासकीय अधिकारी झाले आहेत. आपल्याला कमी लेखू नका. आपल्यातील न्यनगंड, अहंकार बाजूला ठेवा. स्पर्धा परीक्षेसाठी कोचिंग क्लॉससाठी मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागते, ही भावना बाजूला ठेवून दैनिकांचे दररोज वाचन, परिसर अभ्यास, बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम, १० ते १२ तास योग्य पुस्तकांचे वाचन करावे. मी प्रशासकीय अधिकारी बनणारच, हा ध्येय उराशी बाळगल्यास आपण निश्चितच अधिकारी बनणार, ऐवढे मात्र निश्चितच. यासाठी या मार्गदर्शन केंद्रामध्ये आपण सुद्धा वर्ग घेणार असून वाचनालयास आपल्याकडून पुस्तके देणार असल्याचे सांगून स्पर्धा परीक्षेवर आधारित प्रश्नसंच पुरविणार असल्याचे सांगितले.प्राचार्य मंजू चंद्रिकापुरे व प्रशांत गाळे यांनीसुद्धा यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी बँक अधिकारी झालेल्या नितीन शहारेचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन केंद्रात कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते. प्रास्ताविक सुनिता हुमे यांनी मांडले. संचालन विपीन मेश्राम यांनी केले. आभार प्रांजली लांडगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी लोकेश चांदेवार, कमलेश ब्राम्हणकर, स्वप्नील लोथे, शुभांगी भागडकर, तेजस्वीनी इस्कापे, मृणाली कंचलवार, राजेंद्र शहारे, नितीन शहारे यांनी सहकार्य केले.
अधिकारी होण्याची जिद्द बाळगा
By admin | Published: June 23, 2017 1:15 AM