गोंदिया : जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू असून, कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढत असताना दिसत आहे. असे असतानाही पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण होत नसले तरीही आतापर्यंत जिल्ह्यातील ५८ हजार ७९८ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे, तर आता जिल्ह्यात १९०५० डोसचाच साठा उरला आहे.
जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाइन कोरोना वर्कर्सला देण्यात आली. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता केंद्र शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, तसेच ४५ वर्षांवरील काही आजार असलेल्या नागरिकांना लस देण्यास मुभा दिली. त्यानुसार, देशासह जिल्ह्यातही लसीकरण सुरू आहे. या लसीकरणांतर्गत जिल्ह्याला आतापर्यंत लसीचे ७९९०० डोस मिळाले आहेत, तर आतापर्यंत ५८ हजार ७९८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्याकडे आता १९०५० डोस उरले आहेत.
१६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून, यासाठी १४ जानेवारी रोजी जिल्ह्याला १०००० डोस देण्यात आले होते. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी ८००० डोस, १५ फेब्रुवारी रोजी ८३०० डोस, तर २ मार्च रोजी १०६०० डोस देण्यात आले होते. सुरुवातीला हे सर्व डोस कोविशिल्डचेच होते. मात्र, लसीकरणाला गती देण्यासाठी १२ मार्च रोजी जिल्ह्याला ४३००० डोस देण्यात आले. यामध्ये १८००० कोविशिल्डचे, तर २५००० डोस कोव्हॅक्सिनचे आहेत. म्हणजेच, आतापर्यंत एकूण ७९९०० डोस जिल्ह्याला मिळाले असून, आता १९०५० डोस उरले आहेत. यामध्ये १२७२० डोज कोव्हॅक्सिनचे असून, ६३३० डोस कोविशिल्डचे आहेत.
-------------------------------
कोविशिल्डलाच जास्त पसंती
जिल्ह्यात आतापर्यंत ५८७९८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ५१४६६ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर ७३३२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. विशेष म्हणजे, लस घेणाऱ्या नागरिकांत ४७०५२ नागरिकांनी कोविशिल्डचा डोस घेतला असून, ११७४६ नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे. यावरून कोविशिल्डला घेण्यासाठी नागरिक जास्त पसंती देत असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
------------------------------------
नागरिकांनी पुढे येण्याची गरज
१६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यानंतरही आतापर्यंत फक्त ५८७९८ नागरिकांनी लस घेतली असल्याचे दिसत आहे. यातच पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांचा समावेश आहे. आता २ महिन्यांच्या या कालावधीत फक्त ५८७९८ नागरिकांनी लस घेणे म्हणजे लसीकरणाला हवी तशी गती दिसून येत नाही. कोरोनाची लस सर्वांसाठी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले असून, आता कोरोनाचा कहर पुन्हा वाढत असल्याने नागरिकांनी लवकरात लवकर लस घेण्याची गरज आहे.