डॉक्टर्स असोसिएशनची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन गोंदिया : बोगस डॉक्टर शोधमोहिमेंतर्गत इलेक्ट्रोहोम्योपॅथी डॉक्टर्सवर कारवाई केली जात असून त्यांना बोगस ठरविले जात आहे. ही कारवाई थांबविण्यात यावी अशी मागणी करीत इलेक्ट्रोहोम्योपॅथी असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील इलेक्ट्रोहोम्योपॅथी पदवीधारण करणाऱ्या लोकांवर अन्न व औषधी प्रशासन, पोलीस प्रशासन व तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडून बोगस डॉक्टर म्हणून कार्यवाही केली जात आहे. ही बोगस डॉक्टर शोध मोहीम स्वागतार्थ असली तरी कुठेतरी इलेक्ट्रोहोम्योपॅथीच्या लोकांवरच कार्यवाही होत असल्याचे दिसते. इलेक्ट्रोहोम्योपॅथीचे लोक मुंबई उच्च न्यायालयाचे निर्णय व शासनाच्या खुलासाप्रमाणे एम.एम.पी. अॅक्ट १९६१ अंतर्गत नोंदणी शिवाय व्यवसाय करू शकतात. तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. करिता ही कारवाई थांबविण्यात यावी अशी मागणी करीत मेडिकल असोसिएशन आॅफ इलेक्ट्रोहोम्योपॅथीकडून संघटनेचे अध्यक्ष डॉ. के.जी.तुरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. यावर जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी, या प्रकारावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा संघटनेकडून इलेक्ट्रोहोम्योपॅथी पदवीधारकांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यास सांगीतले. याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. गणेश हरिणखेडे, सचिव डॉ. संतोष येवले, सहसचिव डॉ. बी. एम. पटले, कोषाध्यक्ष डॉ. राजेश तिवारी, समन्वयक डॉ. विनोद भगत, डॉ. सी.एस. भगत, डॉ.ओ.टी. भैरम, तिरोडा तालुका सचिव डॉ. गणेश बिसेन, डॉ. डोये, डॉ. बहेकार, डॉ. संदीप तुरकर, डॉ. एस.एफ. कटरे, डॉ. जे.टी. रहांगडाले, डॉ. डी.एल. पटले, डॉ. तरोणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इलेक्ट्रोहोमिओपॅथी डॉक्टर्सवरील कारवाई थांबवा
By admin | Published: August 07, 2016 12:59 AM