बाराभाटी : राज्य रस्ते परिवहन महामंडळाची एसटी ग्रामीण भागातील प्रवाशांचे भरवशाचे प्रवासाचे माध्यम आहे. मात्र, एसटी चालक प्रत्येक थांब्यावर बस थांबवित नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची अडचण होते. त्यामुळे प्रत्येक थांब्यावर बस थांबविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आता लॉकडाऊन शिथिल झाले असून, नागरिकांची कामे सुरू झाली आहेत. यामुळे आता सामान्य नागरिक कामासाठी बाहेर पडत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना बस हेच प्रवासाचे प्रमुख साधन आहे. पण, अर्जुनी - मोरगाव ते गोंदिया आणि ब्रम्हपुरी - अर्जुनी - मोरगाव - गोंदिया या दोन्ही लोकल बसेस असूनही प्रत्येक बसथांब्यावर चालक थांबवत नाही. हे राज्यमार्ग असून, या मार्गावर अनेक लहान - सहान गाव आहेत. तरीसुध्दा बसचे चालक व वाहक यांच्या बेजबाबदारपणाने बस थांबविली जात नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची अडचण होते. या मार्गावरील प्रत्येक बसस्थानकावर बस थांबली नाही तर रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा बाराभाटी, येरंडी - देवलगाव, कवठा, डोंगरगाव, बोळदे, सुकळी व नवेगावबांध या गावातील नागरिकांनी दिला आहे.
-------‐---------------‐-
सध्या १५ जूनपर्यंत उभे प्रवासी घेऊन जाता येत नाही. पण, प्रत्येक थांब्यावर बस थांबणार. याबाबत प्रत्येक चालक व वाहकांना सांगितले आहे.
- टी. आय. ऊईके, उप आगार व्यवस्थापक, डेपो गोदिंया.