गोंदिया : नगरपरिषद अध्यक्ष अशोक इंगळे यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत गोंदिया शहरात झालेल्या व नियोजित विकासकामांबाबत चर्चा केली, तसेच गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचे विस्तारीकरण थांबविण्याची मागणी करीत त्यांना निवेदन दिले.
उल्लेखनीय आहे की, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा विस्तार रीवा (मध्य प्रदेश)पर्यंत करण्याचा प्रस्ताव सेंट्रल रेल्वेद्वारा रेल्वे विभागाला पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावाची माहिती गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना मिळताच, याबाबत तीव्र रोष व्यक्त केला आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना या गाडीचा लाभ मिळत असून, ती जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. या गाडीच्या माध्यमातून गोंदिया, भंडारा, बालाघाट आदी जिल्ह्यांतील हजारो प्रवासी प्रवास करतात व गाडीतून दूध, फळ-भाजी, औषधे, कुरियर-डाकसेवा व असंख्य जीवनोपयोगी वस्तू व गरजांची पूर्तता होते. गोंदिया, तिरोडा, तुमसर, भंडारा, कामठी-कन्हान, नागपूर व अन्य शहरांमध्ये काम करणारे स्थानिक नागरिकांकरिता ही ट्रेन एक प्रकारे वरदान आहे. त्यामुळे गाडीची वेळ पूर्वीप्रमाणेच करावी व गाडीतील सर्व डबे गोंदिया-नागपूर व नागपूर-गोंदिया दरम्यान पूर्ववतच सामान्य दर्जाचेच ठेवण्यात यावे, अशी मागणीही इंगळे यांनी निवेदनातून केली आहे. यावर, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना तत्काळ कार्यवाहीकरिता प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे महामहिम राज्यपालांनी इंगळे यांना आश्वस्त केले.