इंदोरा-बु. : तिरोडा तालुक्यातील अर्जुुनी येथे वैनगंगा नदीच्या रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केली जाते. या नदी घाटावरून रेती काढण्यासाठी व रेतीची वाहतूक करण्यासाठी अर्जुनी गावातून रात्रंदिवस मोठ्या जड वाहनांची वाहतूक होत आहे. त्यामुळे गावातील रस्ता पूर्णत: उखडला आहे. गावातून जड वाहतूक बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याच रस्त्यावर हायस्कूल व प्राथमिक शाळा असून विद्यार्थ्यांची धावपळ नेहमीच सुरु असते. गावातील रस्ता अरूंद आहे व या रस्त्यावर एकामागे एक पाच ते सात मोठ्या टिप्परची ये-जा सुरू असते. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांनासुध्दा फार त्रास सहन करावा लागत आहे. जड वाहनांमुळे पूर्ण रस्ता उखडला असून रस्त्याच्या बाजूला व रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहे. सदर रस्ता एकेरी वाहनाच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. परंतु या रस्त्यावरून रेतीच्या जड वाहनांमुळे पूर्ण रस्ता तुटका व खड्डेमय झाला आहे. यात विद्यार्थी व नागरिकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच रस्त्यावरून अर्जुनी-सावरा-पिपरिया बससुध्दा चालत आहे. यात रेतीचे ट्रक आल्यास या रस्त्यावरून बस धावणे कठीण होत असून केव्हाही अपघात होवू शकतो. ग्रामपंचायतला माहिती असूनसुध्दा पदाधिकाऱ्यांनी डोळे बंद करून घेतले आहे. पिपरिया वैनगंगा नदीच्या रेतीघाटावरून जड वाहनांची वाहतूक थांबवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
गावातून जड वाहतूक बंद करा
By admin | Published: July 10, 2015 1:51 AM