काचेवानी : तिरोडा तालुक्यातील सालेबर्डी ग्रामपंचायतची नवीन इमारत विनापरवानगी पाडण्यात आली. सरपंच व ग्रामसेवकाच्या या अनागोंदी कारभाराची तक्रार तीन ते चार महिन्यापूर्वी करण्यात आली. मात्र त्यांच्यावर कसलीही कारवाई न करता उलट त्याच ठिकाणी इमारत तयार करण्याची परवानगी देण्यात आल्याने संतप्त ग्रा.पं. सदस्य व गावकऱ्यांनी ‘आधी कारवाई करा, नंतरच बांधकाम करा’ असा पवित्रा घेवून उपोषण सुरू केले.सालेबर्डी ग्रामपंचायतचे बांधकाम थांबविण्यासाठी तिरोडा पंचायत समितीसमोर शुक्रवारी १६ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यात अंजीलाल देवचंद बोहणे, अरविंदप्रसाद बोबडे, विजयकुमार बोहणे, इस्ताऊ बाभरे, लोकचंद बाभरे, सिमराज नागपुरे आणि अंबरसिंग लिल्हारे यांचा समावेश आहे. उपोषणकर्त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, १७ सप्टेंबर २०१४ रोजी ग्रामसभेचा ठराव, नमुना सात-बारा देण्यात आला, तो अवैध आहे. गट-३१२ आरजी ०.१२ आबादी (सरकार) दाखविण्यात आले आहे. हे गट वास्तविकतेवर आधारित नसून ग्रामसभा झालीच नाही, असे ते म्हणाले.सालेबर्डीचे सरपंच मंगला राहुल आणि ग्रामसेवक कापगते यांच्यावर पोलीस कारवाई करून पदमुक्त करण्यात यावे, ग्रामपंचायत इमारतीचे वादग्रस्त बांधकाम त्वरित बंद करावे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कारवाईचा अहवाल तक्रारकर्त्यांना तत्काळ द्यावे, खंडविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात सुधारणा करून विहीर, बोअरवेल, सौंदर्यीकरण व सुरक्षाभिंत यांचा समावेश करण्यात आला त्यात नासाडीची आकारणी करण्यात यावी, चुकीची जमीन दाखवून जागेचा नवीन प्रस्ताव घालण्यात आल्यावर परवानगी देण्यात आली ती रद्द करण्यात यावी, परवानगी न घेता तोडण्यात आलेल्या इमारतीच्या ठिकाणी नवीन इमारत बांधकामाचे देयक बिले काढण्यात येवू नये, शौचालय व नळ जोडणीच्या कामात सरपंच व ग्रामसेवकाने केलेल्या भ्रष्टाचार व अपहाराबाबत कारवाई करावी, सरपंच मंगला राहुल यांनी दोन नावांचा उपयोग करून लाभ घेतला याची चौकशी करावी व ज्यांच्याकडे घर नाही त्यांना शौचालय योजनेचा लाभ दिला त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. (वार्ताहर)
अवैध काम थांबवा
By admin | Published: January 18, 2015 10:46 PM