नाना पटोले यांची माहिती : गरिबांना ६ हजार घरे मिळणार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दहावी, बारावीचा निकाल लागला की विविध कागदपत्रासाठी विद्यार्थ्यांची झुंबळ उडते. यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातोच, मानसिक त्रास होतोच शिवाय त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होते. हे दिवस शेतीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी यंदापासून गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले मिळविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती खा. नाना पटोले यांनी स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली. दहावी,बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी नॉन क्रिमीलेअर, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखल, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासाठी तहसील कार्यालयातील सेतूमध्ये गर्दी करावी लागते. दिवसभर वाया घालवूनही अनेकदा त्यांचे काम होत नाही. सेतू चालविणाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होते. हे होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना मे च्या शेवटच्या आठवड्यातच त्यांच्या शाळांमध्येच आवश्यक दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे मागवून शाळेतच त्यांना दाखले देण्यात येणार आहे. शासनाच्या ठरावीक दरातच ते दाखले विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार असून त्यांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी आपण केलेला हा प्रयत्न असल्याचे सांगितले. नगर परिषद व सर्व नगर पंचायती अंतर्गत येणाऱ्या गरीब कुटूंबाना ६ हजार घरे देण्याचा मानस आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे सांगीतले. सोबतच शासनाच्या मुद्रा कर्ज योजना, जीएसटी अशा विविध विषयावर चर्चा केली. यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे व इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मुद्रा कर्ज योजनेतून रोजगार निर्मीती करायची होती. गरजूंना त्याचा लाभ देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना व बँकाना असल्याचे सांगण्यात आले. गोंदिया शहराची १२५ कोटीची भूमिगत गटार योजना काम न होताच परत गेली. आता अमृत अटल योजनेच्या माध्यमातून नवीन गटार योजना तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे खा. नाना पटोले यांनी सांगितले.
सेतूतील लूट थांबविण्यासाठी शाळेतच मिळणार दाखले
By admin | Published: May 11, 2017 12:16 AM