सभापतींची तानाशाही थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:16 AM2018-05-23T00:16:25+5:302018-05-23T00:16:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेतील पाणी पुरवठा विभागाच सभापती आपल्या मनमर्जीने तानाशाही करून काम करीत आहेत. शिवाय आदर्श आचार संहितेचे त्यांच्याकडून उल्लंघन होत असल्याने त्यांची तानाशाही थांबविण्यात यावी. अशी मागणी कॉँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
पाण्याच्या टँकरला घेऊन कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक भागवत मेश्राम व पाणी पुरवठा विभागाचे सभापती दीपक बोबडे यांच्यात वाद झाला होता. सभापती बोबडे यांनी मेश्राम यांच्या प्रभागात पाण्याचे टँकर पाठवू नये, असे अदेश विभागातील परिचराला दिले होते. तेव्हापासून कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक व सभापती बोबडे यांच्यात वाद सुरू आहे.
दरम्यान, कॉँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी सभापती बोबडे यांच्या कामकाजाबाबत थेट जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे. निवेदनात, १६ फेब्रवारी रोजी सभापतींच्या निवडणुका पार पडल्या असून आतापर्यंत किमान तीन सभा घेणे अपेक्षित होते. जेणे करून आवश्यक कामांना मंजुरी देता आली असती. मात्र सभापतींनी एकही सभा घेतली नाही व सभा न घेताच व विषय पारित न करता कामे करीत आहेत. शिवाय कामांतही पक्षपात केला जात आहे.
उन्हाळा लक्षात घेत लोकांना बोअरवेलवर अवलंबू रहावे लागते. मात्र यंदा बोअरवेल दुरस्तीच्या निविदा काढण्यात आली, नसून अन्य कोणत्याही प्रकारच्या निविदा झालेल्या नाहीत. तरीही सभापती जुन्याच दराने आपल्या लोकांच्या कामांचे कार्यादेश काढत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात २६ एप्रिल रोजी आचारसंहिता लागू होऊनही पाणी पुरवठा विभागाकडून अनेक प्रकारच्या निविदा बोलाविल्या जात असून ते नियमानुसार अवैध आहे. एकंदर सभापती आपल्या मनमर्जीने कामकाज करीत असून जनतेच्या पैशांची उधळण करीत असल्याचे निवेदनात नमूद असून यावर त्वरीत रोक लावण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना बांधकाम समिती सभापती व गटनेता शकील मंसूरी, माजी नगरसेवक राकेश ठाकूर, नगरसेवक क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, देवा रूसे उपस्थित होते.