गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रेल्वेने मागील वर्षभरापासून लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद करून विशेष आणि स्पेशल गाड्या सुरू ठेवल्या आहेत; मात्र या गाड्यांचे प्रवास भाडे दुप्पट केले आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. स्पेशल गाड्यांचे भाडे अधिक असल्याने सणासुदीच्या दिवसात कुटुंबासह रेल्वेने प्रवास करणे अनेकांना अवघड जात आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून परिस्थिती सुद्धा पूर्वपदावर आली आहे. तर रेल्वे अद्यापही पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू केल्या नसल्या तरी विशेष आणि स्पेशल गाड्यांच्या संख्येत सातत्याने वाढ करणे सुरू ठेवले आहे. मग विशेष आणि स्पेशल गाड्यांमधून कोरोनाचा संसर्ग होत नाही का? की रेल्वेकडून हेतूपुरस्पर स्पेशल गाड्यांच्या नावावर एकप्रकारे प्रवाशांची लूट सुरू ठेवायची आहे हे कळण्यास मार्ग आहे. आता सणांना सुरुवात झाली असून प्रवाशांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे आता तरी रेल्वे इतर गाड्यांची संख्या वाढवून स्पेशल गाड्यांच्या नावावर लूट थांबवावी, असा सूर प्रवाशांमध्ये उमटत आहे.
...............
दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार
- दीड वर्षापासून कोरोनाच्या नावावर रेल्वेने केवळ विशेष गाड्या सुरू ठेवल्या.
- विशेष आणि स्पेशल गाड्यांच्या तिकिटाचे दर हे दुप्पट आहे.
- त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
- केवळ विशेष गाड्या सुरू असल्याने आरक्षण केल्याशिवाय प्रवास करता येत नाही.
................
जनरल डबे अनलॉक केव्हा होणार
- केवळ विशेष आणि स्पेशल गाड्या सुरू असल्याने त्यात आरक्षण करणे अनिवार्य आहे.
- जनरल डब्यातसुद्धा आरक्षण असल्याशिवाय प्रवास करता येत नाही.
- त्यामुळे दीड वर्षापासून जनरल डबे लॉक केल्याचे चित्र आहे.
- त्यामुळे नियमित आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा आर्थिक भुर्दंड बसत आहे.
.................
स्पेशल भाडे कसे परवडणार
विशेष गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी आरक्षण करणे अनिवार्य आहे. शिवाय यासाठी आकारले जाणारे प्रवास भाडेसुद्धा दुप्पट आहे. त्यामुळे रेल्वेने जवळच्या प्रवासाठी दूरच्या अंतराचे पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे प्रवास करणे महागडे झाले आहे.
- दिनेश चचाने, रेल्वे प्रवासी
............
गेल्या वर्षभरापासून रेल्वेच्या विशेष गाड्यांची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. पण अद्यापही रेल्वेने नियमित गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा काढला नाही. त्यामुळे प्रवाशांना दुप्पट तिकीट दराचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
- नीरज गुप्ता, प्रवासी
.........................
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन
जबलपूर-चांदाफोर्ट
हावडा-मुंबई मेल
समता एक्स्प्रेस
छत्तीसगड-अमृतसर एक्स्प्रेस
हावडा-अहमदाबाद
पुणे-हावडा एक्स्प्रेस
.........................