लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रेमाचे प्रतीक आणि गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यांच्या संख्येत जिल्ह्यात वाढ होत असल्याचे दहा दिवसांपूर्वीच झालेल्या सारस गणनेनंतर स्पष्ट झाले होते. मात्र आपल्या जोडीदाराच्या शोधात भरकटलेल्या एका सारस पक्ष्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.३०) सकाळी गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे घडली.दासगाव येथील शेतकरी बेलकर हे मंगळवारी सकाळी आपल्या शेतावर गेले असता त्यांना शेतालगत असलेल्या विद्युत खांबाजवळ एक सारस पक्षी मृतावस्थेत आढळला. त्यांनी याची माहिती सेवा संस्थेच्या सदस्यांनी दिली. त्यानंतर सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. मृतक सारस पक्ष्याचे वय एक वर्ष असून तो आपल्या साथीदाराच्या शोधात भटकत असताना त्याचा विद्युत धक्का लागून मृत्यू झाला असावा अंदाज सेवा संस्थेच्या सदस्यांनी वर्तविला. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वीच सेवा संस्थेतर्फे सारस गणना करण्यात आली होती. त्यात जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या वाढली होती.
महाराष्ट्रात सर्वाधिक सारस पक्ष्यांचा अधिवास हा गोंदिया जिल्ह्यात असून मागील आठ दहा वर्षांपासून जिल्ह्यात सारस संवर्धन मोहीम राबविली जात आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सारस पक्ष्यांचा आकडा ४८ वर पोहचला आहे. तर सारस पक्ष्यांच्या वाढत्या संख्येमुळे गोंदिया जिल्ह्याला सुध्दा सारसांचा जिल्हा अशी नवीन ओळख पात्र होत होती. मात्र विद्युत धक्क्याने एका सारस पक्ष्याचा मृत्यू झाल्याने त्यांच्या संख्येत घट झाली असून पर्यावरण प्रेमींसाठी ही निश्चितच निराशाजनक आहे.
नवीन भरारी व उडणे शिकताना उडण्यावर पूर्णपणे नियंत्रण न आल्याने अशा बहुतांश घटना घडतात.मागील दोन वर्षांत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने सारस पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.अशा घटना टाळण्यासाठी यावर उपाययोजना करुन त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.- सावन बहेकार, अध्यक्ष सेवा संस्था गोंदिया