गोंदिया : जिल्ह्यात बुधवारी (दि. २२) आलेल्या वादळी वारा व पावसामुळे तालुक्यातील धान पीक जमिनीवर झाेपले असून, शेतकऱ्यांना यामुळे चांगलाच फटका बसणार आहे.
तालुक्यातील शेतकरी खरिपात ९० दिवसांचे धान लावतो. सप्टेंबर महिन्यात धान पीक निघून तयार होत असतानाच बुधवारी (दि. २२) आलेल्या वादळी वारा व दमदार पावसामुळे तालुक्यातील रावणवाडी, मुरपार, चारगाव, सिरपूर आदी गावांतील शेतकऱ्यांचे हलके धान पीक जमिनीवर लोळले असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. येत्या १०-१५ दिवसात धान पिकाची कापणी करून धान घरी घेऊन जाण्याची शेतकऱ्यांनी तयारी केली होती. मात्र, मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, त्याने धान पिकाला जमीनदोस्त केले आहे. बुधवारी आलेल्या पावसामुळे तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांची प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.