रावणवाडी : मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तालुक्यात आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याबाबत शासकीय यंत्रणेने प्रत्येक गावात प्रत्यक्ष नुकसानीचे सर्वेक्षण केले. मात्र अद्याप तालुक्यातील वादळग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत प्राप्तच झाली नसून आताही नुकसानग्रस्त आर्थिक मदत कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. वादळग्रस्तांना शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे यासाठी नुकसानग्रस्तांनी स्थानिक तलाठी कार्यालयांना नुकसानीची माहीती पुरविली. त्याच आधारे नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण करून संबंधित वरिष्ठांना कळविली. मात्र अद्याप आर्थिक मदत प्राप्त झाली नाही. नुकसान झाली त्याबाबदची मदत कधी व केव्हा मिळणार याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. याबद्दलची विचारपूस नुकसानग्रस्तांकडून सर्वत्र केली जात आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना अद्याप आर्थिक मदत केली नाही. मग नुकसानीचे सर्वेक्षण फक्त देखाव्यासाठीच करण्यात आले काय? असा सवाल नुकसानग्रस्तांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. घरावरचे छप्पर वादळाने मोडकळीस आले आहे. कोणत्याही घडीला जोरदार पाऊस पडू शकतो. अशात आपल्या कुटूंबासोबत विना छताच्या घरात वास्तव्य करावे तरी कसे, अशा प्रश्न नुकसानग्रस्तांना पडला आहे. वादळग्रस्त आर्थिक मदतीकरीता सरकारी कार्यालयात फिरताना दिसून येत आहेत. मात्र त्यांच्या परिस्थितीला कुणीही समजून घेण्यास तयारच नाहीत. शासनाच्या संबंधित विभागाने योग्यरित्या वादळग्रस्तांना शासकीय मदत त्वरीत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त करीत आहेत. (वार्ताहर)
वादळग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित
By admin | Published: July 03, 2016 1:54 AM