अर्जुनी मोरगाव : कथा ही माणसाला आकार देते, जगणे शिकविते तसेच मन जुडविते. कथा ही माणसाची कहाणी असते, कथेने समाजाचे वास्तव चित्र मांडत असणे आणि माणसाचे माणूसपण असे जगणे शिकविते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, लेखक व कथाकार प्रा. डॉ. अनंता सूर यांनी केले. ते ऑनलाईन कथाकथनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळेस गोव्याच्या प्रसिद्ध कवयित्री चित्रा क्षीरसागर यांनी उद्घाटन केले. तसेच सहभागी कथाकार म्हणून सीमा भसारकर, शशिकला मदनकर, संगीता धोटे, छाया जांभुळे, प्रियंका ठाकरे, मंजुषा साखरकर, अनुपमा जाधव, सोनाली सहारे, संगीता घोडेस्वार आदी सहभागी झाल्या होत्या. लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशिय संस्था, येरंडी - बाराभाटी संचालित परिवर्तनशील साहित्य महामंडळ महाराष्ट्र राज्य व गोवा यांच्या सौजन्याने हे ऑनलाईन कथाकथन घेण्यात आले. विविध विषयांच्या सामाजिक, शैक्षणिक, भावगर्भ, चित्तथरारक अशा कथांचे सादरीकरण झाले.
याप्रसंगी प्रसिद्ध कवी व साहित्यिक मुन्नाभाई नंदागवळी यांनी कथा कशी असावी, कथेचे प्रकार कोणते? कथा अशा लिहायला पाहिजेत, यावर उत्तम मार्गदर्शन केले. तसेच क्षीरसागर यांनीही गोव्याच्या कथा मांडल्या.
ऑनलाईन कथाकथनाचे संचालन मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले. डाॅ. सुकेशिनी बोरकर यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी टी. एस. बंसोड, प्रियंका वंजारी, मनीषा घरडे, काजल नंदरधने, शैलेंद्र बोरकर, मनोज भगत व रतन लांडगे यांनी सहकार्य केले.