केशोरी : शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत केशोरी परिसरातील अनेक आदिवासी बहुल गावात गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आले आहेत. तेव्हापासून महिला वर्ग चुलीच्या धुरापासून सुखावली होती. परंतु आता गॅस सिलिंडरची किंमत ९०० च्या वर झाल्यामुळे या आदिवासी भागातील गरीब कुटूंबाना महागाईची झळ बसत आहे. परिणामी उज्वल गॅस योजनेचा फज्जा उडाला असून पुन्हा सरपण जमा करुन चूल पेटविणे सुरु झाले आहे.
केशोरी परिसरातील आदिवासी बहुल गावात मोठ्या प्रमाणात यापूर्वी चुलीचा वापर केला जात होता. महिलांना चुलीपासून निघणाऱ्या विषारी धुरामुळे त्रास होवून फुफुसाचे आजार बळावू नये त्याचबरोबर जंगल तोडीवर आळा बसण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना कार्यान्वित करुन त्या योजनेतंर्गत या परिसरातील घराघरात गॅस सिलिंडर पोहचविण्याचे उत्कृष्ट कार्य केले. त्यामुळे चूल पासून महिलांना मुक्ती मिळाली होती. परंतु आता घरगुती गॅस सिलिंडरचे दर एकदम वाढविल्यामुळे अनेक घरामध्ये गॅस सिलिंडरचा वापर कमी होवून चूल पेटविण्याचे प्रकार वाढल्याने निदर्शनात येत आहेत. सिलेंडरची वाढलेली ९०० रुपये किंमत देणे गरीब कुटूंबाना परवडणारे नाही त्या कुटूंबाच्या दृष्टीने ही रक्कम मोठी आहे. कोरोनाच्या महामारीने नागरिकांच्या हाताला काम नाही. जेमतेम मिळणाऱ्या मजुरीतून कसा तरी कुटूंबाचा उदरनिर्वाह कुटूंब प्रमुख करीत असतो. सतत वाढणाऱ्या गॅसच्या किंमतीमुळे गॅस विकत घेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याजवळ एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे सरपण गोळा करुन चुली पेटविण्याची वेळ आली आहे.
...............