केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील सार्वजनिक विद्युत पथदिवे गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. परिणामी, गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस अंधाराचा सामना करावा लागत आहे. पथदिवे केव्हा सुरू होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सार्वजनिक विद्युत पथदिव्यांचे विद्युत बिल थकीत असल्याने विद्युत वितरण कंपनीने सार्वजनिक पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. तेव्हापासून केशोरी गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावातील सार्वजनिक विद्युत पथदिव्यांची फक्त देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची असून, विद्युत बिल भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. जिल्हा परिषदेने सार्वजनिक विद्युत पथदिव्यांचे थकीत बिल भरण्याचे नाकारून आपली जबाबदारी झटकली आहे. विद्युत वितरण कंपनीने थकीत असलेल्या बिलाची मागणी करून, पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. तेव्हापासून केशोरी येथील सार्वजनिक पथदिवे बंद आहेत. शासनाने आदेश काढून ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून थकीत विद्युत पथदिव्यांच्या बिल भरण्याबाबत सूचना केल्या आहेत, परंतु येथील ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाची प्राप्त निधी गाव विकासाच्या बाबीवर खर्च करण्याचे नियोजन करून विनियोग केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे स्वनिधी उपलब्ध नाही. सार्वजनिक विद्युत पथदिव्यांचा थकीत विद्युत बिल भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
............
शासनाने तो आदेश त्वरित मागे घ्यावा
गाव विकासासाठी खर्च होणारा निधी सार्वजनिक पथदिव्यांचा थकीत विद्युत बिल भरण्यासंदर्भातील शासनाने आदेश काढून क्लिष्टता निर्माण केल्याचा आरोप तालुका सरपंच संघटनेचे प्रमुख नंदू पाटील गहाणे यांनी केला आहे. पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतीने दिरंगाई केल्यास सरपंच व ग्रामसेवक यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरून अन्याय केला आहे. या प्रकारामुळे ग्रामसेवक व सरपंच यांच्या डोक्यावरील ताण वाढला आहे. शासनाने काढलेला आदेश त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.