बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
तिरोडा : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना फटका बसत आहे.
चांदोरी खुर्द रस्ता अपघाताला आमंत्रण
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील पिपरिया चांदोरी खुर्द-खैरलांजी पिपरिया रस्ता खराब झाल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
तंटामुक्त गाव अभियान नावापुरतेच
सडक अर्जुनी : राज्य शासनाच्या तंटामुक्त गाव अभियान योजनेला गावागावातील राजकीय गटबाजी आणि अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे ग्रहण लागल्याने या अभिनव योजनेचा फज्जा उडाला आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
खातिया : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे धोका होऊ शकतो.
वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार वाढला
सालेकसा : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले असून याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसत आहे. परंतु वन्यप्राण्यांसाठी हा लॉकडाऊन पर्वणी ठरत असून माणसाला घरी राहावे लागत असताना वन्यप्राणी बिनधास्त मुक्त संचार करीत आहेत. सालेकसा तालुक्याचा मोठा भूभाग घनदाट वनाने आच्छादित असून येथील जंगलात तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची संख्या भरपूर आहे. येथील जंगल इतर राज्यांच्या घनदाट वनक्षेत्राशी जुळलेले असल्यामुळे हिंसक प्राण्यांसह सर्वच प्राण्यांचा वावर बघायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे एवढा बदल झाला की, रस्त्यावर वाहनाचे येणे-जाणे बंद झाल्याने हे वन्यप्राणी आता स्वच्छंद विहार करताना दिसत आहेत. तालुक्यात सालेकसा ते दरेकसा व पुढे चांदसूरजपर्यंत राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. तसेच दरेकसा, बिजेपार, पिपरिया परिसरात व इतर परिसरात सुद्धा सधन वन परिसर आहे.
घाटावरून रेतीची तस्करी सुरूच
तिरोडा : तालुक्यातील घाटकुरोडा येथील रेती घाट क्रमांक १ चा अद्यापही लिलाव झालेला नाही, मात्र या घाटावर दररोज मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा सुरू आहे. परिणामी शासनाचा महसूृल बुडत आहे. त्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी सरपंच प्रकाश भोंगाडे यांनी केली आहे. घाटकुरोडा येथील रेती घाट क्रमांक १ वरून रेती माफिया मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने रेतीची तस्करी करत आहेत. परिणामी शासनाचा महसूलसुद्धा बुडत आहे. त्यामुळे स्वामित्व धनाची आकारणी करून शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत घाटकुरोडाला हा घाट देण्यात यावा, जेणेकरून शासनाला राजस्व प्राप्त होऊन रेती तस्करीला आळा घालण्यास मदत होईल, अशी मागणी सरपंच प्रकाश भोंगाडे यांनी केली आहे.
खतांचा अतिवापर धोकादायक
बोंडगावदेवी : चांगले पीक घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत आहेत. परंतु, अलीकडे या खतांचा अति वापर होत आहे. त्यामुळे त्याचा मानवी जीवनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता अन्न प्रशासन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली
पांढरी : गावविकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, मार्च महिन्यापासून आजपर्यंत नऊ महिन्यांचा कालावधी संपला असून, कराची रक्कम ग्रामपंचायतीला कोरोनाच्या प्रभावामुळे वसूल करता आली नाही. त्यामुळे गावविकासाची घडी विस्कटल्याचे चित्र आहे.
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : विविध शासकीय कार्यालयांतील कामकाजासह खासगी कंपनी कार्यालयांतील कामे ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे. मात्र, आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. यात दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
अधिकाऱ्यांकडून गावागावांत जनजागृती
साखरीटोला : कोविड चाचणीदरम्यान तालुक्यात नियमित मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सदर परिस्थितीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करीत खुद्द तालुका अधिकाऱ्यांनी गावांमध्ये भोंगा वाजवून जनजागृती केली जात आहे. याला प्रतिसाद मिळत आहे. नागरिक देखील स्वत: हून लसीकरणासाठी पुढे येत आहे.