केशोरी : वीज वितरण कंपनीने येथील पथदिव्यांची जोडणी गेल्या २०-२५ दिवसांपूर्वी खंडित केल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. पावसाचे दिवस असतानाही नागरिकांना अंधाराचा सामना करण्याची वेळ आली आहे. सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी वेळोवेळी प्रयत्न करूनही येथील पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरू होऊ शकला नाही ही ग्रामपंचायतची शोकांतिकाच म्हणावी लागेल.
राज्य शासनाने ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून गावातील सार्वजनिक पथदिव्यांचे थकीत बिल भरण्याचे आदेश दिले आहेत. परंतु पथदिव्यांचे बिल भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असताना गाव विकास कामे करणे सोडून सार्वजनिक पथदिव्यांचे वीज बिल का भरावे, असा प्रश्न उपस्थित करून सरपंच-उपसरपंच संघटनेने बिल भरणार नाही, असा निर्णय घेतला आहे. तसेच पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषदेने भरावा अशी मागणी करून शासनाकडे निवेदन सादर केले आहे. परंतु अजूनही सार्वजनिक पथदिव्यांच्या बिल भरण्याचा तिढा सुटलेला नाही.
हा प्रश्न फक्त केशोरी या गावासाठी मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्याचा प्रश्न आहे. जिल्ह्यातील राजकीय पुढाकाऱ्यांनी शासन दरबारात ज्यांचे वजन अशा पुढाऱ्यांनी ग्रामपंचायतींची अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतीची शोकांतिका शासनाकडे मांडून पथदिव्यांच्या थकीत वीज बिल भरण्यासंबंधीचा तिढा सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.