गोंदिया : मागील दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे विरुद्ध आणि आमदार असा गुप्त संघर्ष सुरू होता. या संघर्षात शिक्षक आणि ग्रामसेवकांच्या आंदाेलनाची भर पडली. डांगे यांनी आमदारांवर वरचढ होण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वरचढपणा करणे त्यांना भाेवला. त्यामुळे जिल्ह्यातील चारही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना गाठून डांगे यांची थेट तक्रार केली. यानंतर गुरुवारी (दि.२७) डांगे यांच्या बदलीचे आदेश धडकले. त्यामुळे आमदारांचे एकीचे बळ अन् सीईओंची विकेट गेल्याचा अनुभव जिल्हावासीयांना आला.
कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे जि. प.वर प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांचा कुठलाच वचक नसल्याने काही अधिकारी मनमर्जी कारभार करीत आहे. आमदारांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डांगे यांनी स्वत:वरच संकट ओढवून घेतले. दवनीवाडा येथील शाळा बांधकामाचे चौकशी प्रकरण असो वा शिक्षकांच्या निलंबनाचा विषय त्यांनी नेहमीच एकांगी भूमिका घेतली. हीच भूमिका त्यांना भोवली. त्यातच ग्रामसेवकांचे निलंबन प्रकरणसुद्धा चांगलेच भोवले. जि. प.मुख्य कार्यकाऱ्यांविरुद्ध ग्रामसेवकांनी प्रथमच एवढी उघड भूमिका घेतली. याचा संदेशसुद्धा मुंबईपर्यंत गेला. शिवाय त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून काही वादग्रस्त प्रकरणे भोवली. केवळ विरोधी नव्हे, तर सत्ता पक्षाच्या आमदारांनीसुद्धा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांसमोर डांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. तेव्हापासूनच त्यांच्या बदलीचे वारे वाहू लागले होते. त्यांच्या बंगल्यावरील बागेत एका अधिकाऱ्याने टाकलेल्या सेंद्रिय खताच्या प्रकरणाची चर्चासुद्धा चांगली होती. ही सर्वच प्रकरणे डांगे यांच्या बदलीस कारणीभूत ठरली. असो, पण शेवटी या निमित्ताने जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांचे एकीचे बळ फळाला आले म्हटल्यास वावगे होणार नाही. हीच भूमिका यापुढे कायम ठेवल्यास निश्चितच जिल्ह्याच्या विकासाची गाडी अधिक वेगाने धावेल हे कुणीही नाकारू शकत नाही.
...........
त्या प्रकरणाची चौकशी कराच
केवळ विरोधी पक्षाचे नव्हे, तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीसुद्धा काही प्रकरणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. आता त्यांची बदली झाली म्हणून या प्रकरणावर पडदा न टाकता या प्रकरणाची सखोल चौकशी करून एकदा ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊन जाऊ द्या.