गोंदिया : आपल्या देशात ऋतूनुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होत असतात आणि ती फळे त्या-त्या ऋतूमध्ये शरीराचा आरोग्यविषयक समतोल राखण्यासाठी फार महत्त्वाची ठरतात. अशाचप्रकारे उन्हाळ्यात सर्वात महत्वाचे व लोकप्रिय फळ म्हणजे आंबा. यासारख्या बहुपयोगी व लाभकारक फळ कदाचित दुसरे नाही. तीव्र उन्हात काम केल्याने किंवा उन्हातून आल्यानंतर शरीराला उन्हाळी लागण्याच्या तक्रारी नेहमीच येतात. अशावेळी कच्या आंब्याचे पन्हे लाभदायक ठरत आहे.विशेष करून गावरान आंबा म्हटले तर तो पाहताच तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. मग तो पिकलेला आंबा असो किंवा कच्चा कैऱ्या असोत. गावरान आंब्याचेसुध्दा हजारो प्रजाती असतात आणि प्रत्येकामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक गुण असतात. आंब्यापासून आमरस, लोणचं, आमचूर, आमटी, चटणी इत्यादी विविध व्यंजन तयार केले जातात. तसेच जेवण्याच्या मेनूत आंब्याला व आंब्यापासून बनलेल्या पदार्थाना विशेष महत्त्व आहे. यातच एक महत्त्वाचे व्यंजन म्हणजे कच्च्या आंब्याचे पन्हे; ज्याला कैरी पन्हे असेही म्हणतात. कैरीचे पन्हे उन्हाळ्यात उष्णता शमविण्यासाठी रामबाण उपाय असते. कैरीचे पन्हे सर्वात जास्त गुणकारी पण सर्वात स्वस्त असा उपाय मानला जातो आणि ते शाश्वत सत्य आहे. आज बाजारात उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी विविध प्रकारचे आकर्षक लेबल लावलेले पेय पदार्थ मिळतात. परंतु त्या पदार्थामध्ये आकर्षण जास्त आणि गुणकारी तत्व कमी असतात. परंतु कैरीचे पन्हे प्रत्येक घरी बनविले जाऊ शकते. यासाठी खूप मोठी प्रक्रिया करावी लागत नाही. मोठा खर्च करावा लागत नाही. ग्रामीण भागात राहणारा गरीब मजूर शेतकरी वर्ग कै री पन्हे पिऊन आपल्या शरीराची दाहकता शमविण्यात विश्वास करतो. मात्र हा विश्वास उच्च शिक्षीत वर्गाला ही बसत आहे. परंतु आधुनिक जीवन शैलीत थोडे कैरीचे पन्हे तयार करायला ही लोकांना थोडासा वेळ मिळत नाही. त्यामुळे शरीराला योग्य पदार्थ उपलब्ध करवून देण्यात ते मुकतात. (प्रतिनिधी)
कच्या आंब्याचे पन्हे लाभदायक
By admin | Published: April 21, 2016 2:15 AM