केशोरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेल्या कोरोना तपासणीत कोरोना बाधितांची संख्या आढळून आल्याने कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता गुरुवारपासून (दि.१५) पुढील ५ दिवसांसाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक संचारबंदी लागू केली जाणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये पार पडलेल्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे.
सरपंच नंदू पाटील गहाणे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या बैठकीला प्रामुख्याने उपसरपंच रामकृष्ण बनकर, ठाणेदार संदीप इंगळे, माजी उपसरपंच हिरालाल पाटील शेंडे, चेतन दहीकर, हरिराम पेशने, योगेश नाकाडे, पोलीस पाटील नानाजी पेंदाम, गुलाब शेंडे उपस्थित होते. या संचारबंदीमध्ये रुग्णालय व औषधी दुकाने वगळून सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय बहुमताने सभेत घेण्यात आला. घोषित लॉकडाऊनच्या काळात जर कुणीही नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय गावात फिरताना आढळला तर त्याच्यावर ५०० रुपये दंड आकारून कडक कारवाई करण्यात येईल. एखाद्या दुकानदाराने शटर बंद करून साहित्य विकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल, असेही ठरविण्यात आले आहे. यावेळी कोरोनाची साखळी तोडण्याशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी कडक लॉकडाऊन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. लॉकडाऊन काळात विनाकारण गावात फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून चौकाचौकात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कोणीही सुटणार नाही, असे गावात शासकीय गाडी फिरवून तंबी वजा आवाहन करण्यात आले आहे.