लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एसटी महामंडळाचे जोपर्यंत विलीनीकरण केले जात नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा गोंदिया आणि तिरोडा आगारात संप सुरूच असल्याने एसटीचे चाके रुतलेलीच आहेत. संपामुळे या दोन्ही आगारांच्या दररोजच्या ४१३ बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी मागील महिनाभरापासून त्यांच्या मागण्यांना घेऊन संप सुरू केला आहे. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना ४५ टक्के पगारवाढ दिल्यानंतरसुध्दा कर्मचारी एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे काही तुरळक आगार वगळता इतर ठिकाणी एसटीची सेवा बंद आहे. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा हे दोन आगार असून या दोन्ही एकूण १२० बसेस आहेत. तर ३४५ वर कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे या दोन्ही आगारांतून एकही बस धावली नाही. या आगारातून दररोज एसटीच्या दररोज ४१३ बसफेऱ्या होत होत्या. मात्र मागील महिनाभरापासून बससेवा ठप्प असल्याने या दोन्ही आगारांचे दररोजचे ९ लाख रुपयांचे नुकसान होत आहे. तर महिनाभरापासून बसेस एकाच ठिकाणी उभ्या असल्याने त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चातसुध्दा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खासगी वाहनांचे वाढले बुकिंग -तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सुरुवात होते. कोरोनामुळे मागील दोन वर्षे लग्न सोहळ्याला बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला होता. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुुळे लग्न सोहळे लवकर आटोपले जात आहेत. एसटीची सेवा बंद असल्याने खासगी वाहनांचे बुकिंग वाढल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागातील नागरिकांचा पायी प्रवास - जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांची मदार ही बऱ्याच प्रमाणात एसटीवर अवलंबून असते. मात्र बसेस बंद असल्याने आणि प्रवासाचे दुसरे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना आठ ते दहा किमीचा प्रवास पायीच करावा लागत आहे. तर काळी-पिवळी वाहनचालकांनी तिकिटाचे दर वाढविल्याने याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान - मागील महिनाभरापासून बससेवा बंद असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. खासगी वाहनाने नियमित प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर आज होणार कारवाई- संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतरही ते कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर सोमवारी निलबंनाची कारवाई केली जाणार असल्याचे विभागीय नियंत्रकांनी सांगितले.