लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऐन दिवाळीच्या हंगामात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांना घेवून मागील १३ दिवसांपासून संप पुकारला आहे. महांमडळ आणि न्यायालयाच्या निर्देशानंतरही कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्याने महामंडळाने गोंदिया आणि तिरोडा आगारातील २० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. पण यानंतरही संपकरी कर्मचाऱ्यांनी माघार घेतली नसून ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे चित्र आहे. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, यासह काही अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. यावर परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना १ टक्के घरभाडे भत्ता व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. मात्र, राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण हीच मुख्य मागणी पूर्ण केली नाही. यावर कर्मचारी संतापले असून त्यांनी संप सुरूच ठेवला आहे, तर या संपात ३१ ऑक्टोबरपासून गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे संपूर्ण फेऱ्या रद्द आहेत.ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची सर्वाधिक गैरसोय होत आहे. यामुळे त्यांना काळीपिवळी व इतर खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडदेखील सहन करावे लागत आहे. रेल्वे गाड्यात वाढली वेटिंग - मागील १३ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने बसेस पूर्णपणे ठप्प आहेत. तर दिवाळी आणि भाऊबीजनिमित्त बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. बसेस अभावी रेल्वे गाड्यांमधील गर्दी वाढली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये चारशे ते पाचशेपर्यंत वेटिंग लिस्ट आहे. आरक्षित डब्ब्यांमध्ये सुद्धा प्रवाशांची गर्दी वाढली असून आरक्षण करून जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी लोकल पॅसेंजर सुरू नाही- रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी वाढली असली तरी रेल्वे विभागाने केवळ विशेष गाड्याच सुरू ठेवून प्रवाशांची लूट कायम ठेवली आहे. लोकल आणि पँसेजर गाड्या सुरू करण्यासंदर्भात अद्यापही कुठला निर्णय रेल्वे विभागाने घेतला नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.खासगी वाहनांना सुगीचे दिवस - बसेस पूर्णपणे बंद असल्याने काळीपिवळी, खासगी ट्रॅव्हल्समधील गर्दीत वाढ झाली आहे. त्यांनी या संधीचा फायदा घेत तिकीट दरात सुद्धा ५० ते १०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे खासगी वाहनांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. याचा फटका मात्र प्रवाशांना बसत असल्याने मेघराज मेश्राम, दिवाकर चुटे, देवीदास मोहुर्ले या प्रवाशांनी यावर नाराजी व्यक्त केली.