राजीव फुंडे
आमगाव (गोंदिया) :महिला या सर्वाधिक स्वाभिमानी आणि कष्टाळू असतात असं म्हटलं जातं ते त्यांनी पदोपदी जीवनाशी संघर्ष व कार्यकर्तृत्वातून सिध्द केलं आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यापुढे गुडघे न टेकता परिस्थितीशी दोन हात करून पुढे जाण्याची त्यांची नेहमीच तयारी असते. असाच संघर्ष वयाच्या ९० वर्षीही यमनाबाई या करीत आहेत.
आमगाव येथील यमनाबाई वलथरे या ९० वर्षांच्या आहेत. मुरमुरे विकणारी आजी म्हणून आमगाव तालुक्यात ती सर्वांना परिचित आहे. सकाळी सातपासून यमनाबाई मुरमुरे फुटाणे विकण्यासाठी घराबाहेर पडते. वयाची नव्वदी गाठली असली तरी यमनाबाई काठी व चष्माच्या आधार न घेता तुरूतुरू धावते. मागील २० ते २५ वर्षांपासून ती मुरेमुरे फुटाणे विकून आपला उदरनिर्वाह करते. मुलांबाळांवर अवंलबून राहून त्यांचे ओझे होण्यापेक्षा यमानाबाई आत्मनिर्भर होऊन जीवन जगणे आवडते. उन्हाळा, पावसाळा असो हिवाळा तिने आपला मुरेमुरे फुटण्याचा व्यवसाय कधीही बंद ठेवला नाही.
यमनाबाई १९ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचा विवाह झाला, त्यामुळे त्यांना अर्ध्यावरच शिक्षण थांबवावे लागले. त्यांना एक मुलगा आहे. संसाराचा गाडा सुरळीतपणे सुरू असताना अचानक पतीचे निधन झाले. त्यामुळे मुलाची आणि कुटुंबाची जवाबदारी त्यांच्यावर आली. मात्र, त्या डगमगल्या नाहीत. मुरमुरे आणि फुटाणे विक्री करून कुटुंबाचा गाडा पुढे रेटू लागल्या. यमनाबाईंचा मुलगा टेर्लर असून, तोसुध्दा त्यांना ‘हे काम करू नको, माझ्या घरी राहा,’ असा आग्रह करतो; पण आधीपासूनच स्वाभिमानी असलेल्या यमनाबाईला ते मान्य नाही. जोपर्यंत हातपाय साथ देत आहेत तोपर्यंत मुरमुरे आणि फुटाणे विक्री करून आपला उदरनिर्वाह सुरू ठेवण्याचा निर्धार तिने केला आहे. त्यामुळे ते एकटी वेगळी राहून जीवनाशी संघर्ष करीत आहे.
माझ्या कठीण काळात मला माझ्या सासू-सासऱ्यांचा नेहमीच खूप पाठिंबा मिळाला. मी देवाची आभारी आहे की मला असे सासू-सासरे मिळाले. जोपर्यंत अंगात बळ आहे तोपर्यंत परिस्थितीशी दोन हात करून माझा जगण्याचा संघर्ष असाच सुरूच राहणार.
- यमनाबाई वलथरे