गोंदिया : जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी या शाळांच्या भौतिक विकासावर भर देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना भौतिक सुविधा पुरवून शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यासाठी लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. शाळा डिजिटल, पण शाळेत मुख्याध्यापक कक्ष किंवा शिक्षकांसाठी स्टाफ रूम नसल्याची बाब पुढे आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ७२४ शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्ष किंवा स्टाफ रूम नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांना व शिक्षकांना त्रास होत आहे. अर्जुनी - मोरगाव तालुक्यात १३२ शाळांपैकी २१ शाळांत स्टाफ रूम आहेत. परंतु १११ शाळांत नाहीत. आमगाव तालुक्यात ११० शाळांपैकी ३३ शाळांमध्ये स्टाफ रूम आहेत. परंतु ७७ शाळांत नाही. देवरी तालुक्यात १४२ शाळांपैकी ५० शाळांत स्टाफ रूम आहेत, परंतु ९२ शाळांत नाही. गोंदिया तालुक्यात १८८ शाळांपैकी ७१ शाळात स्टाफ रूम आहेत. परंतु ११७ शाळांत नाही. गोरेगाव तालुक्यात १०८ शाळांपैकी ३१ शाळात स्टाफ रूम आहेत. परंतु ७७ शाळांत नाही. सालेकसा तालुक्यात ११२ शाळांपैकी २२ शाळात स्टाफ रूम आहेत. परंतु ९० शाळांत नाही. सडक - अर्जुनी तालुक्यात १०९ शाळांपैकी ४७ शाळात स्टाफ रूम आहेत. परंतु ६२ शाळांत नाही. तिरोडा तालुक्यात १३८ शाळांपैकी ४० शाळात स्टाफ रूम आहेत. परंतु ९८ शाळांत मुख्याध्यापक कक्ष किंवा स्टाफ रूम नाही.
बॉक्स
अनेक समस्या भेडसावतात
शाळेत मुख्याध्यापक कक्ष किंवा शिक्षकांसाठी स्टाफ रूम नसल्याने अनेक समस्या निर्माण होतात. शिक्षकांना रेकॉर्ड ठेवण्यासाठी अडचण निर्माण होते. शिक्षकांना एखाद्या मुद्द्यावर चर्चा करायची असेल तर त्यांना विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन बसावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. मुख्याध्यापकांसाठी कक्ष व शिक्षकांसाठी स्टाफ रूम नसल्याने शैक्षणिक वातावरण निर्माण होऊ शकत नाही. शिक्षकांसाठी स्टाफ रूम नसल्याचा शिक्षणावर परिणाम होतोच.
बॉक्स
गोंदिया तालुका आघाडीवर, पाठोपाठ अर्जुनी - मोरगाव
शाळेत मुख्याध्यापक कक्ष किंवा शिक्षकांसाठी स्टाफ रूम नाही. यात गोंदिया तालुका आघाडीवर आहे. गोंदिया तालुक्यातील ११७ शाळांमध्ये ही सोय नाही. त्यापाठोपाठ १११ शाळा असलेला अर्जुनी - मोरगाव तालुका आहे. त्यानंतर तिरोडा, देवरी, सालेकसा, गोरेगाव, आमगाव व सर्वात कमी सडक - अर्जुनी ६२ शाळांत मुख्याध्यापक कक्ष किंवा शिक्षकांसाठी स्टाफ रूम नाही.
कोट
जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्ष किंवा शिक्षकांसाठी स्टाफ रूम नसले तरी ज्ञान देण्याचे काम आमचे शिक्षक अविरत करीत असतात. विद्यार्थ्यांसाठी पुरेशी व्यवस्था आहे. याचा कुठलाही त्रास होत नाही. शासनाच्या नियोजनानुसार जिल्हा परिषद शाळांचे बांधकाम, वर्गखोल्यांचे काम केले जाते.
-राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, गोंदिया.
...........
जिल्ह्यातील एकूण शाळा- १०३९, मुख्याध्यापक कक्ष नसलेल्या शाळा-७२४
स्टाफ रूम नसलेल्या शाळा -७२४
या शाळांतील विद्यार्थी- ८०५५३
...............