गोंदिया : मागील वर्षी कोरोनाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून यातून ते सावरत असतानाच आता दुसऱ्या लाटेने पुन्हा कहर केला आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. अशातच शाळांकडून फीसाठी तगादा लावला जातो. सर्वसामान्यांची स्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
मागील वर्षी कोरोनाने कहर केल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर सर्व काही विस्कळीत झाले होते. आता दुसऱ्या लाटेने अधिकच कहर केला असून पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे पुन्हा सर्वसामान्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण होत आहे. असे असताना खासगी शाळांकडून कोणचाही विचार न करता फी साठी पालकांना तगादा लावण्याचे प्रकार घडतात. मागील वर्षीही असे झाले आहे. मात्र, आताची स्थिती लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांची फी माफ करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी राजेश खवले यांना निवेदन दिले. पंडित सुरेंद्र शर्मा, महेश तांडी, उमेश अग्रवाल, मुकेश जैन, सुरेश कुरील, अरूण जाधव, चंद्रकांत सणस, संजय कोडवानी, घनश्याम गुप्ता, राकेश लिल्हारे, सोमेश्वर पगरवार, पुष्पा ढाले, विजय शर्मा, हिरानंद ठकरानी आदींनी निवेदन दिले आहे.
----------------------------
सर्वोच्च न्यायालयाच्याही सूचना
शाळा बंद असल्यामुळे त्यांना शाळेत देण्यात येणाऱ्या सुविधांचा खर्चही बंद आहे. यामुळे शाळा संचालनाचा खर्च कमी झाला आहे. अशात विद्यार्थ्यांच्या फीमधून शाळांना फायदा होत आहे. मात्र, आजची स्थिती पाहता शाळांनी फी कमी करावी, असेही सूचविले आहे. मात्र, त्यानंतरही शाळांकडून फी वसूल केली जात आहे ही शोकांतिकाच आहे.
-----------------------------------
वीज बिल व मालमत्ता कर माफ करा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा मागील वर्षासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता करणे कठीण असताना वीज बिल व मालमत्ता कर भरण्यासाठीही पैसे नाहीत. कित्येक नागरिक भाड्याच्या घरात राहतात व त्यांच्याकडे घरभाडे भरण्यासाठी पैसे नाहीत. ज्याप्रमाणे कर्जमाफी दिली जाते त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचे घराचे वीज बिल व मालमत्ता कर माफ करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.