अर्जुनी-मोरगाव : विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या वास्तवातील क्षमतेवर आधारित वर्ग १२ वीचा निकाल लागला आहे. यात फार मोठा सत्यांश आहे. या यशात विद्यार्थ्यांची खरी मेहनत आहे. शिस्त, संस्कार व शिक्षण हीच त्रिसूत्री विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात बाळगली पाहिजे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही बुद्धिमत्तेच्या आधारावर गुणवंत बना, परंतु त्यासोबतच आपल्यातील कौशल्याच्या आधारावर आवडीच्या क्षेत्राची निवड करून त्या क्षेत्रात नामवंत बनावे, असे प्रतिपादन प्राचार्य अनिल मंत्री यांनी केले.
सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय व जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित इयत्ता बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा नानोटी, पर्यवेक्षिका छाया घाटे, मुकेश शेंडे, मुख्याध्यापक हरिदास गहाणे, प्रा. वाय.ए. बुरडे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वतीच्या छायाचित्राचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. टी.एस. बिसेन यांनी बारावीचा निकाल बोर्डाच्या निकषानुसार लावला असून यामध्ये प्राचार्यांची दूरदृष्टी, निरंतर मूल्यमापन पद्धती, सराव परीक्षांचे आयोजन, ऑनलाइन-ऑफलाइन वर्ग यांचा समावेश असल्याचे सांगितले. नानोटी यांनी, विद्यार्थी जीवनात वर्ग १२ वीनंतर जीवनाची दिशा निश्चित होते. या वर्षी परीक्षा झाली असती तर आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना नक्कीच जिल्ह्यात प्रथम स्थान प्राप्त करता आले असते, असे सांगितले. सूत्रसंचालन करून आभार प्रा. इंद्रनील काशीवार यांनी मानले.
-----------------------------
या गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार
याप्रसंगी ९० टक्केपेक्षा जास्त गुण संपादन करणारे विद्यार्थी भैरवी पुस्तोडे, शारदा बरैया, विक्रम गदवार, तृषा हातझाडे, कांचन शहारे, कशिश मेश्राम, चेतन खुणे, कुणाल चांदेवार, वैभव चकोले, हर्षल बोरकर, अंकिता गहाणे, अंजली बनसोड, विधी जांभूळकर व प्रियंका रॉय या विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.