गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले आहेत. १५ जानेवारीपासून महाविद्यालयेसुद्धा सुरू होणार आहेत; पण पहिली ते चौथीसंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनासुद्धा आपण आता शाळेत जावे, असे वाटत असले तरी त्यांच्या पालकांची मात्र अद्यापही यासाठी मानसिकता तयार झालेली नाही. अजून काही दिवस वाट पाहू. त्यानंतरच मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेऊ. मात्र, तूर्तास तरी यासाठी घाई नको, असा सूर पालकांमध्ये आहे, तर मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने पहिली ते चौथीचे सर्वच विद्यार्थी घरीच आहेर. ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असला तरी मुले घरी राहून कंटाळली आहेत. त्यांच्यामध्ये चिडचिडपणा वाढत चालला आहे, तर कधी एकदाची शाळा सुरू होते आणि आपले आई-वडील आपल्याला शाळेत पाठवितात याची उत्सुकता मुलांमध्ये आहे. कोरोनाचा संसर्ग जरी पूर्णपणे कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर आली असली, तर पालकांना अजूनही आपल्या पाल्यांची काळजी वाटत असून, शाळांमध्ये पाठविल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेतली जाणार की नाही, अशी चिंतासुद्धा त्यांना वाटत आहे. त्यामुळेच ते तूर्तास तरी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.
......
जिल्ह्यातील एकूण पहिली ते चौथीच्या शाळा
८३४
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची संख्या
४२,२३०
...........
मुलांना हवी शाळा; पण पालकांची ना
घरी राहून मलासुद्धा आता कंटाळा आला आहे. कधी एकदाची शाळा सुरू होते आणि मी शाळेत जातो याची उत्सुकता लागली आहे; पण माझे ममी-पप्पा काळजीपोटी अजून काही दिवस शाळेत जाऊ नको म्हणतात.
-राघिनी शेंडे, इयत्ता पहिली
......
शाळा बंद असली तरी आमचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे; पण जी मजा शाळेत गेल्यानंतर येते ती मजा या अभ्यासात येत नाही. शाळा सुरू झाली, तर मी नक्कीच शाळेत जाईन.
-रोहित हिवारे, इयत्ता दुसरी
......
माझा मोठा भाऊ पण आता शाळेत जात आहे; पण आमची शाळा अजून सुरू झाली नाही. आमची शाळा सुरू झाल्यावर मीपण नियमित शाळेत जाईन. घरी राहून आता कंटाळाला आला आहे.
-प्रत्यूष अग्निहोत्री, इयत्ता तिसरी
...
कोरोनामुळे वर्षभरापासून शाळेत जाता आले नाही, तर घरी राहून ऑनलाइन अभ्यास आणि शाळा करून कंटाळा आला आहे. जी मजा शाळेत जाऊन शिक्षण घेण्यात येते ती यात नाही. शाळा सुरू झाल्यास मीसुद्धा नियमित शाळेत जाईन.
-पार्थ नक्षिणे, इयत्ता चौथी
.........
पालकांची चिंता कायम
कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असला तरी पहिली ते चौथीत जाणारी मुले ही लहान असतात. त्यामुळे ती शाळेत गेल्यानंतर स्वत:ची काळजी घेणार की नाही, हे सांगता येत नाही. तूर्तास तरी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करू नयेत.
-श्वेता मस्के, पालक
.....
शासन जरी पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा विचार करत असले तरी पालक तयार होणार नाहीत. अजून काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे तूर्तास तरी मुलांना शाळेत पाठविण्याची घाई करणार नाही.
-डॉली काकडे, पालक
......
पहिली ते चौथीत शिकणारी मुले ही फार लहान असतात. त्यामुळे शाळेत गेल्यानंतर स्वत:ची तेवढी काळजी घेऊ शकणार नाहीत, तर पालकांनासुद्धा सतत काळजी लागून राहील. त्यामुळे तूर्तास तरी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करू नयेत.
-प्रशांत मेश्राम, पालक
.....
पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या तरी मी माझ्या पाल्यांना सध्या तरी शाळेत पाठविणार नाही. अजून काही दिवस वाट पाहणार, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावरच मुलांना शाळेत पाठविणार. शाळेत पाठविण्याची घाई नको.
-प्रमोद पारखी, पालक
....