केशोरी : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मार्च २०२० पासून शासनाच्या आदेशानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शैक्षणिक कार्याची सुरुवात दरवर्षी जून महिन्यात होत असते. मात्र कोरोनाच्या दुष्पपरिणामामुळे पहिल्या वर्गातील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना फक्त कागदावरच ठेवण्यात शिक्षकांना समाधान मानावे लागले. पहिल्या वर्गातील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना शाळेचा उंबरठा एकही दिवस न ओलांडता दुसऱ्या वर्गात वर्गोन्नती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याविषयी पालकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थी दुसरीमध्ये जाऊनही त्या विद्यार्थ्यांला प्रथम ज्या शिक्षणाची गरज आहे त्या अ,ब,क,ड अक्षरांच्या ओळखीपासून विद्यार्थी दूर गेला आहे. त्यामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शासनाने शाळा बंद करून त्याऐवजी ऑनलाइन शिक्षण प्रणाली कार्यान्वित केली आहे. मात्र या शिक्षण प्रणालीचा आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागात काहीच उपयोग होत नाही.
कारण या भागात गरीब व शेतमजूर मोठ्या प्रमाणात आहेत. ही मंडळी सतत कामाच्या शोधात भटकंती करीत असतात. त्याची मुले खेळण्यात व्यस्त असतात. कोणत्याही कुटुंबाकडे स्मार्टफोन असेल तर त्यांच्याकडे फोनला कनेक्टिव्हिटी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण प्रणालीपासून विद्यार्थी अलिप्त राहिले आहेत. मागील वर्षीच्या पहिल्या वर्गातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी अजूनही शाळेचे तोंड बघितले नसताना दुसऱ्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा शासनाने निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शैक्षणिक विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.