इसापूर : हे स्पर्धात्मक युग असून, यशप्राप्तीसाठी संयम, सातत्य आणि परिश्रम या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास सहज उद्दिष्ट प्राप्त होऊ शकते. ध्येयपूर्तीच्या मार्गात सामाजिक व आर्थिक अडचणी येतात. त्यावर जो मात करतो तो इतिहास घडवितो. मात्र, व्हॉटस्ॲप, फेसबुक व यूट्यूबचा अतिवापर न करता उद्देशपूर्तीसाठीच या साधनांचा वापर करा. क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे, असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी केले.
येथील शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयात गुरुवारी (दि.२६) आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आश्विन चंदेल होते. याप्रसंगी आयक्यूएसी समन्वयक डॉ. के.जे. सीबी आणि आयोजक डॉ. नितीन विलायतकर उपस्थित होते. प्रास्ताविकातून प्रा. विलायतकर यांनी महाविद्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या प्री.आय.ए.एस. कोचिंग सेंटरचे उद्दिष्ट स्पष्ट केले. संचालन हर्षा कापगते यांनी केले. आभार मयूर बोरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. शरद मेश्राम, प्रा. द्वारपाल चौधरी, डॉ. भरत राठोड, मनोज झोडे, सुनीता तवाडे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.