गोरेगाव : तालुक्यातील मरारटोली-बाघोली येथील नाल्यावरील पुलावरून दोन फूट पाणी वाहत असताना कुऱ्हाडी येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गावकऱ्यांच्या मदतीने या पुलावरून विद्यार्थ्यांची ने-आण करणे सुरू आहे. पण याची शासन व प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास सराव सुरू आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२७) सकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे तालुक्यातील मरारटोली नाल्याच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच पंचायत झाली. पुलावर पाणी असल्याने विद्यार्थ्यांना गावकऱ्यांच्या मदतीने या पुलावरून ने-आण करण्यात आली. थोडाही जोराचा पाऊस झाला की या पुलावरून पाणी वाहते. हा प्रकार पावसाळ्यात नेहमीचाच झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करावा लागतो.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ४० वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पण या पुलाची फारच उंची कमी असल्याने या पुलावरून पावसाळ्यात नेहमीच पाणी वाहते. या पुलावरून गेल्यावर्षी दोन मोटारसायकल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर गावकऱ्यांनी अनेकदा या पुलाची उंची वाढविण्याची मागणी शासन आणि प्रशासनाकडे केली. पण त्याची अद्याप दखल घेतली नसल्याने विद्यार्थी व गावकऱ्यांना असा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांचे होते शैक्षणिक नुकसानतालुक्यातील बाघोलीच्या लगत असलेल्या मरारटोली येथील लोकसंख्या जेमतेम आहे. पुढील शिक्षणाची परिसरात सोय नसल्याने मरारटोली व परिसरातील विद्यार्थ्यांना कुऱ्हाडी येथे जावे लागते. मात्र पावसाळ्यात नेहमीच या पुलावरून पाणी वाहत असल्याने बरेचदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. पण याची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे, तर शुक्रवारी (दि. २७) झालेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांना नाल्यावरील दोन फूट पाण्यातून असा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला.