जिल्हाधिकारी व सीईओंचा पुढाकार : दर महिन्याच्या दुसऱ्या गुरूवारी शाळांमध्ये प्रेरणा दिवस नरेश रहिले गोंदिया प्रत्येक विद्यार्थी देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आधारस्तंभ असल्याने तो अधिकाधिक सुसंस्कारित व्हावा. त्याला मोठे स्वप्न पाहता यावे आणि ते पूर्ण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ‘प्रेरणा’ दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांची जडण-घडण शालेय जीवनातच व्हावी याकरीता ‘प्रेरणा दिवस’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरूवात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या संकल्पनेतून केली जाणार आहे. त्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरूवारी (सुटी असेल तर पुढच्या दिवशी) प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. स्वप्न बघण्यासाठी बालकांना प्रोत्साहन द्या, स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्यासमोर प्रेरणा असणे आवश्यक आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीचे आपण प्रेरक बना, त्याकरिता शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आपण मनापासून योगदान देवून आपल्या नियमित कामकाजातून वेळ काढून महिन्यातील एक दिवस शाळेसाठी द्यावा, ही अपेक्षा ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना शाळांना भेटी देण्याचे आदेश दिले. यातून जि.प. शाळांतील विद्यार्थी घडविण्यावर त्यांनी भर दिला आहे. जीवनात सुख-दु:खाचे यशाचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. आपल्या भौतिक गरजा मर्यादित ठेवून ध्येय पूर्तीसाठी जे धडपडतात तेच समोर जातात. एखाद्या पलीकडे पाहण्याची आपली दृष्टे बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते. या विचारातून जिल्हाधिकारी व मुख्य कायरपालन अधिकारी यांनी या प्रेरणा दिनाची संकल्पना पुढे आणली. शाळा भेटीदरम्यान अधिकाऱ्यांना निरीक्षण तक्ता दिला जाणार आहे. तो मुख्याध्यापक अथवा शिक्षकांकडून भरून न घेता आपल्या कौशल्याचा वापर करुन नकळत निरीक्षण करायचे आहे. त्यात स्वत:चे वास्तविक मत नोंदवावे, असे अधिकाऱ्यांना सूचविण्यात आले. भेटीसाठी जात असताना एखादी बोधकथा, विनोद, प्रसंग, घटना, थोर व्यक्तीच्या जीवनातील संस्मरणीय अनुभव विद्यार्थी व शिक्षकांना सांगून वातावरण खेळकर व प्रेरणादायी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. शाळाभेटी देताना या सूचना पाळा शाळेमध्ये जाण्यापूर्वी आपणाला मुख्याध्यापक संपर्क करतील. तसे न झाल्यास आपण संबंधित तालुक्याचे शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व त्या शाळेमध्ये मार्गदर्शक म्हणून आपण येणार असल्याबाबत स्पष्ट करावे. परिपाठाच्या वेळी ५ ते ७ मिनिट आपले मनोगत मांडावे. यावेळी विद्यार्थ्यांना ऊण किंवा पाऊस याचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आपले अनुभव कथन करताना आपण जि.प.शाळेमध्ये शिक्षण घेतल्यास जि.प.शाळेतूनही आपण अधिकारी कसे झालो हे सांगून विद्यार्थी, शिक्षकांना प्रेरीत करावे. भेटीच्या वेळी शाळेतील शिक्षकांची वैयक्तिक चर्चा करावी. शाळा, मुख्याध्यापक, पालक याबाबतच्या अडचणी आहेत का? एकमेकांचे टिमवर्क कसे आहे? चांगल्या शिक्षकांची कुंचबणा होते का? याबाबत सविस्तर निरीक्षण करावे. शाळेची तपासणी करणे हा या भेटीचा उद्देश नाही. शाळेमध्ये शक्यतो एखादा पाठ घ्यावा, जर शक्य नसल्यास शिक्षकांच्या अध्यापनाचे निरीक्षण करावे. अध्यापनात परिणामकारकता कशी आणता येईल यावर चर्चा करावी. विद्यार्थ्यांशी संवास साधताना भयमुक्त तथा मैत्रीपूर्ण व्यवहार करावा, असे सूचविण्यात आले.
स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांना मिळेल ‘प्रेरणा’
By admin | Published: August 11, 2016 12:05 AM