सावरटोला येथील कार्यक्रम : आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील ग्राम सावरटोला येथील हरीहर मत्स्यव्यासाय सहकारी संस्था व भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाच्या संयुक्तवतीने आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस गावतलावावर साजरा करण्यात आला.जैवविविधता संर्वधन संबंधातील प्रश्न सोडविण्यासाठी व स्थानिकस्तरावर त्याबद्दल जाणीवजागृती व्हावी हा उद्देश समोर ठेवून आंतरराष्ट्रीयस्तरावर रविवारी (दि.२२) जैवविविधता दिवस साजरा केला जातो. जैवविविधतेमध्ये पाणी व त्यावर अवलंबून असलेले जीव, जंगल, जमीन व त्यावर अवलंबून असलेले जीव यांचा समावेश होतो. शेतीमध्ये किटकनाशकाच्या वापरामुळे होणारे दुष्टपरिणाम, संपत चाललेले जंगल, तलावामध्ये बाहेरुन आलेले मासे व वनस्पतीच्या अनावश्यक जातीमुळे होणारे दुष्परिणाम इत्यादी विविध विषयांना घेऊन जैवविविधतेचा शाश्वत वापर करण्याची गरज आपल्याला माहिती झाली पाहिजे. त्यादृष्टीने सकारात्मक विचार समोर ठेवून जैवविविधता शाश्वत वापर करण्याची गरज आलप्याला माहिती झाली पाहिजे व जैवविविधता संवर्धनामध्ये आपल्या सर्वांचा हातभार लागला पाहिजे या सर्व बाबींचा विचार करुन हा दिवस आंतरराष्ट्रीयस्तरावर साजरा करण्यात येतो.हरीहर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेअंतर्गत येणाऱ्या सावरटोला येथील गावतलावामध्ये सदाफुली ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर पसरली असताना या वनस्पतीचे निर्मूलन करणे अतिशय आवश्यक आहे. या वनस्पतीच्या पसाऱ्यामुळे तलावातील जैवविविधतेला आवश्यक वनस्पती संपूर्णपणे संपत चालल्या आहेत. यामुळे मासे, पक्षी व एकूनच जैवविविधतेला यावर मोठा परिणाम होऊन तलाव धोक्यात आले आहे. याशिवाय या वनस्पतीच्या पान व देठामध्ये सेलेनीयम नावाचा विषारी घटक असतो. हा घटक गुरांच्या संपर्कात आल्यास त्याचा परिणाम दुधावर होऊन शेवटी आपल्या आहारामध्ये विषच जात आहे. ही वनस्पती तलावाच्या सांडव्यावर असल्यास मत्स्य चढणाऱ्या वेळी अडथडा निर्माण होतो. मासे चढल्यास अडथडा निर्माण झाल्याने नैसर्गिकरित्या बिजमिर्मिती तलावामध्ये होत नाही. यामुळे मुलकी मासे ज्यात मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये असतात ते संपत चालले आहेत. सदाफुली वनस्पतीचे निर्मूलन अतिशय आवश्यक असून शासनाने महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या दर पत्रकावर याचे दर ठरवून सदाफुली निर्मूलनाचे काम त्वरीत करणे अतिशय आवश्यक आहे.या दिनानिमित्ताने सावरटोला येथील गजानन महिला स्वयं सहायता बचत गटाचे सदस्य, सरपंच वैशाली राखडे, पं.स.सदस्य गिता मेश्राम, तंमुस अध्यक्ष राधेश्याम तरोणे, जैवविविधता समितीचे सदस्य पांडुरंग मनिराम भोपे,गावकरी व हरीहर मासेमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ भोपे व सर्व सदस्यगण तसेच भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाचे मनिष राजनकर, परिराम तुमसरे, विजय रुखमोडे, दिलीप पंधरे, महेंद्र राऊत, नंदलाल मेश्राम, शालू कोल्हे, इंदिरा वेठी, सरीता मेश्राम यांनी सदाफुली निर्मूलनाच्या कार्यक्रमात सहकार्य केले. (वार्ताहर)
जैव विविधतेवर केला अभ्यास
By admin | Published: May 24, 2016 2:00 AM