पाण्याची व्यवस्था नाही : दरवर्षी आटतात विहिरी, बोअरवेलची मागणी कपिल केकत गोंदिया येथील सुभाष बागेत पाण्याची योग्य ती व्यवस्था नसल्याने पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे. आता विहीरीने काम कसे-बसे निघत असले तरी उन्हाळ््यात विहीरही आटते. अशात मात्र बागेत ‘कोरड’ पडणार व झाडांना पाणी देणे संभव होणार नाही. करिता बगिचा प्रशासनाकडून एका बोअरवेलची मागणी केली जात आहे. मागील वर्षापासून यासाठी पत्र दिले असून आतापर्यंत बोअरवेल मिळालेली नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा सुभाष बागेसाठी भारी जाणार असल्याचे दिसते. शहरात आज फक्त सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बाग हेच एकमेव बाग उरले आहे. दिवसभर कामाच्या थकव्यानंतर झाडांच्या सावलीत बसून निवांत वेळ घालविण्यासाठी वृद्धांपासून तरूण मंडळीही बागेत येते. हिरव्यागार झाडांच्या सावलीत बसून आपला काही वेळ घालविण्यासाठी शहरवासीयांची बागेत गर्दी होते. शहरातील एकच बाग असल्याने चिमुकल्यांचीही येथील खेळणे व हिरवळीवर खेळण्यासाठी गर्दी असते. अवघ्या शहरातील नागरिकांची बागेकडेच धाव असते. त्यातही उन्हाळ््यात शाळांच्या सुट्या लागल्यानंतर चिमुकल्यांसह पालकही बागेत येतात व बागेत पाय ठेवायला जागा उरत नाही. या बागेतील हिरवळीसाठी बागेत दोन विहिरी व एक बोअरवेल आहे. मात्र उन्हाळ््याच्या सुरूवातीपासूनच या विहिरी आटतात. शिवाय बोअरवेल मागील तीन-चार वर्षांपासून बंद पडून असल्याची माहिती आहे. त्यामुळे उन्हाळ््यात झाडांना पाणी द्यावे कसे अशा प्रश्न सध्या बगिचा प्रशासनापुढे उभा आहे. पाण्याची ही समस्या सुटावी यासाठी प्रभारी बगिचा निरीक्षक प्रवीण मिश्रा यांनी नगर परिषदेकडे एका बोअरवेलची मागणी केली आहे.विहिरी आटल्यास बोअरवेलद्वारे पाणी देता येईल असा त्यांचा या मागचा हेतू आहे. मात्र त्यांच्या मागणीवर अद्याप तरी काहीच निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. एक बोअरवेल मिळाल्यास बागेतील पाण्याची समस्या सुटणार. मात्र अशा या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.अशात यंदा बागेला बोअरवेल मिळाली नाही तर यंदाचा उन्हाळा सुभाष बागेसाठी भारी जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सुभाष बागेला उन्हाळा पडणार भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2017 12:59 AM