लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चारही निवडणुकांसाठी बुधवारपासून (दि. १) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समिती १०६, नगरपंचायतच्या ५१ आणि ६४ ग्रामपंचायतींसाठी येत्या २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून प्रारंभ होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ६ डिसेंबर तर नगरपंचायतींसाठी ७ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. १३ डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. १४ डिसेंबरपासून निवडणुकीसाठी प्रचाराचा रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी गर्दी कमीच राहण्याची शक्यता आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित झाले नसून सध्या उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दी होण्याची शक्यता आहे. तर हीच स्थिती नगरपंचायत निवडणुकीसाठी कायम राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेणार असल्याने जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. मुलाखतींचे सत्र जोरात, उमेदवार निवडताना लागतोय कस - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची यादी सर्वच पक्षांत मोठी आहे. यासाठी अनेकांनी मागील सहा महिन्यांपासून पक्ष नेतृत्वाकडे फिल्डिंग लावून ठेवली होती. त्यातच मंगळवारपासून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली. एक एका जागेसाठी आठ ते दहा उमेदवार इच्छुक असल्याने नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची, असा प्रश्न पक्षांच्या नेत्यांसमोर निर्माण झाला आहे. इनकमिंग व आऊट गोईंग जोरात - निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याचे पाहून अनेकांनी आहे त्या पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांत सध्या इनकमिंग आणि आऊट गोईंगचे वारे जोरात सुरू आहे. दररोज अनेक कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत.
फुलचूर जिल्हा परिषद क्षेत्रात होणार दिग्गजांची लढत - गोंदिया शहरालगत असलेल्या फुलचूर जिल्हा परिषद जनरल असल्याने या क्षेत्रातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची यादीदेखील लांब आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या विद्यमान आमदाराचा पुतण्या सुद्धा या ठिकाणाहून निवडणूक लढणार असल्याचे बोलल्या जाते. तर भाजपाकडून संजय टेंभरे आणि राजेश चतुर हे दावेदार मानले जाते आहे. यापैकी कुणाला तिकिट मिळते याकडे लक्ष आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा तगड्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे.