गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन कापणीला आलेले धानाचे उभे पीक आडवे झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर संकट उभे ठाकले आहे. शनिवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे
आमदार विनोद अग्रवाल यांनी दौरा करून पाहणी केली. तसेच नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
याच विषया संदर्भात आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेत आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली. सोबतच गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीबाबत मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. तोडगा न निघाल्यास शेतकरी बांधवांना खुल्या बाजारात धान विक्री करण्याची परवानगी देऊन ५०० रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त शेतकरी बांधवांना देण्याची मागणी केली. अनेक शेतकरी बांधवांनी विद्युत जोडणीसाठी अर्ज केला असून, त्यावर काहीच सुनावणी झाली नसल्याचे सुद्धा आमदार अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरपंच, उपसरपंच, कृषी सहायक, तलाठी, चाबी संघटनेचे मनोहर लिल्हारे, नरेश येडे, मुरली नागपुरे, सरपंच लताबाई टेकाम, मधु मेश्राम, जीवन मेश्राम, नेतराम मेश्राम, युवराज ठाकरे, सुनील बेले, हंसलाल बघेले, राजकुमार दमाहे, मुन्नालाल माहुले, गणपत सहारे, तेजराम नागपुरे, मुन्नालाल नागपुरे, सरपंच तुलसी बोहने, उपसरपंच गिरजाशंकर बिरनवार, जयेंद्र लिल्हार उपस्थित होते.
.......
५० हजार रुपये प्रोत्साहन राशी केव्हा?
देवरी, नवेगाव, सोनबिहरी आणि जवळच्या अन्य गावांमध्ये आलेल्या वादळी वाऱ्यासह, पाऊस आणि गारपिटीमुळे खूप मोठे नुकसान झाले. शेतकरीबांधव आधीच संकटात आहे. धानाच्या बोनसची रक्कम अजून शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांना ५० हजार रुपये बोनस राशी प्रोत्साहन पर देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. ती कधी मिळणार? असा सवाल आमदार विनोद अग्रवाल यांनी केला आहे.