बोंडगावदेवी : जन्मदात्या मातापित्यांना प्रथम आदर्शवत ठेवा. आपल्या सान्निध्यात जे-जे येतात त्यांचा मानसन्मान करा. सुसंस्कारासोबतच ज्ञानार्जन करून उज्ज्वल भविष्य करणाऱ्या गुरुजनांना आदराचे स्थान द्या. जीवनाला कलाटणी देणाऱ्या थोरांचा आदर्श ठेवूनच जीवनाचे साफल्य करता येते असे प्रतिपादन सिध्दिविनायक पब्लिक स्कूलच्या संचालिका सोनाली देशमुख यांनी केले.
ग्राम ताडगाव येथील सिध्दिविनायक पब्लिक स्कूलमध्ये आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्राचार्य दुर्योधन बगमारे, सहाय्यक शिक्षक दमा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयातील इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक, शालेय कर्मचारी गुरुपौर्णिमा उत्साहात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी शारदास्तवन गायिले. सूत्रसंचालन एस. एन. देसाई यांनी केले. आभार सहाय्यक शिक्षिका एस. ठाकूर यांनी मानले.