गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतिभासंपन्न व परिश्रमी असतात, पण मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येत नाही, म्हणून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन कसे करावे, याबद्दलही माहिती मिळणार. वेळेच्या योग्य नियोजनातूनच यशाचे शिखर गाठणे शक्य होते, असे प्रतिपादन धोटे बंधू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंजन नायडू यांनी केले.
उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने रविवारी (दि.७) वेबिनारद्वारे आयोजित ‘स्पर्धा परीक्षेत वेळेचे व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन व्याख्यानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून पुणे येथील दूरसंचार विभागाचे उपमहासंचालक सुनील तलवारे आणि कार्यक्रमाचे संयोजक व उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा.धर्मवीर चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी तलवारे यांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मेंदूची कार्यक्षमता अजोड असते, पण आपण याचा वापर सकारात्मक कार्यांसाठी करणे व भावनांवर नियंत्रण करून आपले कार्य करणे गरजेचे आहे. वेळ व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांना विविध भ्रम असतात जसे की, मी माझ्या वेळेचे नियोजन कसेही करू शकतो, वेळेचे व्यवस्थापन व शिस्तीमुळे आयुष्य जगण्याची मजा राहत नाही, व्यक्ती सदैव दबावात राहतो, तसेच कोणतेही काम करायला पुरेसा वेळ राहत नाही, पण हे सगळे भ्रम आहेत. उलट वेळेच्या व्यवस्थापनेमुळे सगळी कामे नीटनेटकी व वेळेत पूर्ण होतात, असे सांगितले, तसेच वेळ व्यवस्थापनात येणारे अडथळे, वेळ व्यवस्थापनाची कौशल्ये, परीक्षेपूर्वी आणि दरम्यान वेळ व्यवस्थापन यावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. चव्हाण यांनी मांडले. या मार्गदर्शन व्याख्यानात ४०० विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी प्रा.संजय तिमांडे, डाॅ.दिलीप चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केेले.